सिन्नर : तालुक्यातील ठाणगावमधील माध्यमिक विद्यालयात दहावीत शिकणार्या पंधरा वर्षीय विद्यार्थिनीची छेड काढणार्या शिक्षकावर सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित विद्यार्थिनीने फिर्याद दाखल केली आहे. संतोष पोपेरे (35, रा. कोंभाळणे, ता. अकोले) असे संशयित शिक्षकाचे नाव आहे.
पोपेरे हा गेल्या दीड वर्षांपूर्वी बदलून आलेला आहे. 23 जुलै 2024 रोजी पीडित विद्यार्थिनी वर्गात बसलेली असताना पोपेरे याने तिला दुसर्या वर्गखोलीत बोलावून तिच्या खांद्यावर हात ठेऊन छेडछाड केली. त्यानंतर घाबरलेल्या पीडितीने कोणालाही काही सांगितले नाही. त्यानंतर ती घाबरलेल्या अवस्थेत वावरत होती. त्यामुळे पालकांनी विश्वासात घेऊन विचारणा केली. तेव्हा तिने पोपेरे या शिक्षकांने छेडछाड केल्याचा प्रकार कथन केला.
त्यानंतर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. पोलिसांनी पोपेरे याच्याविरुध्द पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दिलीप राठोड पुढील तपास करीत आहेत.
संतप्त पालकांनी याबाबत विद्यालयाशी संपर्क साधला. शुक्रवारी (दि.2) दोनशे ते अडीचशे ग्रामस्थ विद्यालयात संबंधित शिक्षकाला जाब विचारण्यासाठी गेले. शालेय समितीचे पदाधिकारीही उपस्थित होते. अशातच काही संतप्त तरुणांनी या शिक्षकाला चांगला चोप दिला. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले.