पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
बाहेरगावी देवदर्शनास गेलेल्या पंचवटीतील महिलेच्या घराची खिडकी उघडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेला डबा लंपास केला. हाच डबा विजयनगर, पंचवटी येथील गॅरेजबाहेर गॅरेजमालकास सापडला असता, त्याने तो प्रामाणिकपणे पंचवटी पोलिस ठाण्यात जमा केला.
दिंडोरील महालक्ष्मी टॉकीजमागे राहणाऱ्या कमलाबाई भुगुरमल पमवानी या गुरुवारी (दि. १) तिरुपती बालाजी येथे दर्शनास गेल्या असता, त्यांच्या घरातून चोरट्यांनी दागिन्यांचा डबा लंपास केला. हा डबा तुषार आढाव यांना त्यांच्या विजयनगर येथील गॅरेजबाहेर पडलेला मिळाला. त्यांनी हा डबा उघडून पाहिला असता, त्यात सोने-चांदीचे दागिने, नाणी, रोख रक्कम व एलआयसीच्या पावत्या आढळल्या. आढाव यांनी तत्काळ हा डबा पंचवटी पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई अमित शिंदे यांच्या मदतीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्याकडे सुपूर्द केला. कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वर्षा पाटील, कर्मचारी अमित शिंदे, सोनाली भालेराव यांनी पंचनामा करून १४.५ तोळे सोने व २७ भार चांदी एकूण ११ लाख १८ हजार १७८ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तसेच पमवानी यांच्या घरातून सोन्याच्या दागिन्यांचा डबा पळवून नेणाऱ्या चोरट्याचा शोध सुरू केला आहे. तसेच गॅरेजमालक आढाव यांचा सत्कार वरिष्ठ पोलिस निरीक्षक कड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पमवानी यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
या डब्यात मिळालेल्या एलआयसी पावतीच्या आधारे पोलिसांनी कमलाबाई पमवानी यांचा शोध घेत त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्या देवदर्शनास गेलेल्या असल्याचे कळले. त्या परतल्यानंतर त्यांच्याकडून मुद्देमाल त्यांचाच असल्याची खात्री करून पोलिसांनी आढाव यांच्या हस्ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्यासमोर त्यांना परत केला.