

नाशिक : महापालिकेत नोकरभरतीचा बिगुल वाजला असून तांत्रिक संवर्गातील अभियंत्यांची भरती प्रक्रिया सुरू होऊन आठवडा उलटत नाही तोच आता अग्निशमन विभागातील फायरमन व चालकांच्या १८६ पदांच्या भरतीसाठी बुधवारी (दि.५) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएस मार्फतच ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
नाशिक महापालिकेचा ब वर्गीय महापालिकांमध्ये समावेश असला तरी आस्थापना परिशिष्ट मात्र अद्यापही क वर्गीय महापालिकेचाच आहे. या परिशिष्टातील विविध संवर्गातील ७ हजार ७२५ मंजूर पदांपैकी सद्यस्थिती सुमारे ३ हजार ८०० पदं रिक्त आहेत. त्यातच पुढील वर्षी आणखी १८० अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त होणार असल्याने महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात अडचणी येणार आहेत. महापालिकेचा ब वर्गीय १४ हजार पदांचा सुधारीत आकृतीबंध शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. मात्र त्यास अद्याप मंजुरी मिळू शकलेली नाही.
दरम्यान, कोरोनाकाळात वैद्यकीय, आरोग्य व अग्निशमन विभागातील ७०६ पदांच्या भरतीला शासनाने मंजुरी दिली होती. या नोकरभरतीसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) सोबत करार देखील करण्यात आला आहे. मात्र, महापालिकेचा आस्थापना खर्च जवळपास ४५ टक्क्यापर्यंत असल्यामुळे पद भरतीस मान्यता मिळत नव्हती. महापालिकेने वारंवार पाठपुरावा केल्यामुळे तसेच आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर आता अग्निशमन व तांत्रिक संवर्गातील पद भरतीला शासनाने आस्थापना खर्चाची अट शिथील करत मान्यता दिली आहे.
येत्या 10 नोव्हेंबरपासून भरतीसाठी अर्ज
राज्य शासनाने तांत्रिक संवर्गातील १४० व अग्निशमनची २०६ रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे. मात्र, आस्थापनाचा वाढता आलेख पाहता महापालिका प्रशासनाने तांत्रिक संवर्गातील ११४ तर अग्निशमनमधील यंत्रचालक-वाहनचालक ३६ तर फायरमनचे १५० पदे भरण्यासाठीच जाहिरात प्रसिद्धीचा निर्णय घेतला आहे. यासाठी १० नोव्हेंबरपासून पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.