नाशिक : जुने नाशिकमधील महात्मा फुले मंडईच्या छतावर चढून वीजेच्या खांबावर झालेला बिघाड दुरूस्त करत असताना विजेचा धक्का लागल्याने महावितरणचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. भिष्माचार्य जालिंदर काशिद (५२,रा.मखमलाबाद) असे जखमी झालेल्या वरिष्ठ तंत्रज्ञचे नाव आहे.
भद्रकाली पोलिस ठाण्यासमोर असलेल्या महात्मा फुले मंडईजवळ महावितरणचे रोहित्रामध्ये रविवारी सकाळी बिघाड झाला होता. त्यामुळे भद्रकाली विभागात नेमणूकीला असलेले काशीद हे दुरूस्तीकरिता त्याठिकाणी गेले होते. त्यांनी मंडईच्या छतावर चढून दुरूस्तीचे काम सुरू केले असताना अचानक त्यांना वीजेचा धक्का बसला व ते बाजूला फेकले गेले. ते कोसळल्याचे लक्षात येताच नागरिकांनी महावितरण व अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. शिंगाडातलाव येथील मुख्यालयातून अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहचला. जवानांनी शिडीच्या सहाय्याने जखमी काशीद यांना खाली आणले. त्यांना मुंबईनाका येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.