नाशिक : शिवसेनेच्या ठाकरे गटाने पहिली उमेदवारी यादी घोषित केली असून, यात नाशिक पश्चिम मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी दिली आहे. मालेगाव बाह्य मतदारसंघातून शिंदे गटाच्या दादा भुसे यांच्यासमोर अद्वैय हिरे यांना उमेदवारी देण्यात आली असून, नांदगावमधून गणेश धात्रक यांना ठाकरे गटाने संधी दिली आहे. निफाडमधून अनिल कदम यांना उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेला नाशिक मध्य मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे गटाच्या वाट्याला गेला असून, या मतदारसंघातून माजी आमदार वसंत गिते यांना उमेदवारी देण्यात आल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
महायुतीकडून आतापर्यंत १८२ उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानतंर महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांकडूनही आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू करण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गटाने बुधवारी (दि. २३) ४० उमेदवारांची पहिली यादी घोषित करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उमेदवारांना तत्काळ एबी फॉर्मचेही वाटप करण्यात आले. पहिल्या यादीत नाशिक जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या वाट्याला आलेल्या नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, मालेगाव बाह्य व नांदगाव या चार मतदारसंघांतील उमेदवारांचा समावेश आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघातून बडगुजर यांना ठाकरे गटाची उमेदवारी मिळणार हे आधीपासून निश्चित होते. परंतु बडगुजर यांचे चिरंजीव दीपक यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या विरोधकांनी बडगुजर यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी काही पर्यायदेखील उभे करण्यात आले होते. परंतु निष्ठावंताला न्याय देण्याची भूमिका खा. संजय राऊत यांनी बोलून दाखविल्यानंतर विरोधकांची तोंड गप्प झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनी ठाकरे गटाने जाहीर केलेल्या पहिल्याच उमेदवारी यादीत बडगुजर यांना स्थान मिळाले आहे.
नाशिक मध्य मतदारसंघ यापूर्वी काँग्रेसच्या वाट्याला होता. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसला सुटेला, अशी अपेक्षा काँग्रेसमधील इच्छुकांकडून व्यक्त केली जात होती. डॉ. हेमलता पाटील या काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार मानल्या जात होत्या; परंतु, महाविकास आघाडीच्या जागावाटपात नाशिक मध्य मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेण्यात ठाकरे गट यशस्वी ठरला. ठाकरे गटाकडून माजी आमदार वसंत गिते यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारीही जाहीर करण्यात आली. त्यामुळे डॉ. पाटील या नाराज झाल्या आहेत. मला काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल, अशी खात्री होती. परंतु नाशिक मध्यची जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली. निवडणूक लढविण्यावर मी ठाम असून, मैत्रीपूर्ण लढत अथवा अपक्ष उमेदवारी कायम ठेवणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. पाटील यांनी व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वीच येवला विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी बुधवारी (दि.२३) उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पार्टीत प्रवेश केला. यावेळी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मतदारसंघाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.
नांदगाव विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांना शिवसेनेची (ठाकरे गट) उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या ठाकरे गटाकडून उमेदवारीच्या आशा मावळल्या आहेत. नांदगाव मतदारसंघात आता शिवसेना शिंदे व ठाकरे गटात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. धात्रक हे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख व मनमाड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत. दरम्यान, आपण राष्ट्रवादीकडूनच उमेदवारी मागितली आहे. ठाकरे गटाकडून मी निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा केवळ मीडियातच आहे, असे स्पष्टीकरण समीर भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे.
मालेगाव बाह्य मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून पालकमंत्री दादा भुसे यांची उमेदवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली होती. भुसे यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने अद्वय हिरे यांना रिंगणात उतरविले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अद्वय हिरे यांना बुधवारी पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला. त्यामुळे मालेगाव बाह्य मतदारसंघातील भुसे विरुद्ध हिरे लढत आता लक्षवेधी ठरणार आहे.