

नाशिक : मखमलाबाद येथील छत्रपती विद्यालय परिसराजवळ दुचाकीस्वार टवाळखोरांनी दामिनी पथकातील महिला पोलिस अंमलदारांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला. म्हसरूळ पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून दोन संशयितांना पकडले आहे.
टवाळखोरांवर वचक ठेवण्यासाठी तसेच महिला सुरक्षिततेसाठी पोलिसांच्या दामिनी पथकामार्फत नियमितपणे गस्त घातली जाते. दामिनी पथकांमुळे शैक्षणिक संस्था, बाजारपेठा, उद्याने, सार्वजनिक ठिकाणी महिला-मुलींना सुरक्षितता मिळते. दामिनी पथकातील दोन महिला अंमलदार मंगळवारी (दि. 10) नेहमीप्रमाणे म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीत सकाळी ११.३० च्या सुमारास गस्त घालत होत्या. त्यावेळी छत्रपती विद्यालयाजवळ एमएच १५ जेबी ९७१५ व एमएच १५ जेपी ५७८६ क्रमांकाच्या दुचाकींवर दोन युवक टवाळखोरी करत होते. त्यांना दामिनी पथकाने हटकले. दोघांपैकी एकाने महिला पोलिसांशी वाद घालून शिवीगाळ, धक्काबुक्की केली. तसेच दमदाटी करून ते पसार झाले. घटनेची माहिती म्हसरूळ पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि वाहनांच्या क्रमांकांवरून दाेघांचा शाेध घेत बुधवारी (दि. ११) त्यांना पकडले. दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपनिरीक्षक दीपक पटारे अधिक तपास करीत आहेत.
म्हसरूळ पोलिसांनी तपास करीत ऋतिक बबन ढोले (१९) व ओमकार फकिरा लिलके (२२, दोघे रा. नवे धागूर, ता. दिंडोरी) यांना बुधवारी रात्री 10 वाजता अटक केली. या घटनेने शैक्षणिक संस्था परिसराजवळ टवाळखोरांकडून होणारा त्रास पुन्हा ऐरणीवर आला आहे.