Nashik Crime News | निवासी वसाहतीत वेश्या व्यवसाय करणारे दोघे गजाआड

संशयित महिलेकडून रहिवाशांना दमदाटी
Prostitute business
निवासी वसाहतीत वेश्या व्यवसाय करणारे दोघे गजाआडFile Photo
Published on
Updated on

नाशिक : छत्रपती संभाजीनगर रोडवरील कपालेश्वरनगर परिसरात निर्माण नक्षत्र इमारतीत राहत्या घरात एका महिलेने उच्चभ्रू वेश्या व्यवसाय सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती गुन्हे शाखेने कारवाई करीत दोन पीडित मुलींची सुटका करत वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या संशयित महिलेसह एकास अटक केली आहे.

मध्यवर्ती गुन्हे शाखेचे हवालदार शेरखान पठाण व गणेश वाघ यांना, एक महिला तिच्या फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय करत असल्याचे समजले. त्यानुसार पथकाचे प्रभारी निरीक्षक डॉ. अंचल मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर बुधवारी (दि. ४) सायंकाळी या ठिकाणी कारवाई करीत दोन पीडित मुलींची सुटका केली. तर वेश्याव्यवसाय चालवल्याप्रकरणी संशयित कविता साळवे-पाटीलसह जाफर मन्सुरी यास अटक केली. दोघांविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात हे दोघे संशयित पीडित मुलींना मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक देहव्यापार करण्यास प्रवृत्त करत असल्याचे समोर आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार समीर चंद्रमोरे, अंमलदार प्रजीत ठाकूर, मनीषा जाधव, वैशाली घरटे, लता सुरसाळवे, स्नेहल सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संशयितेची नागरिकांना दमबाजी

सायंकाळ झाल्याने पोलिसांनी संशयित महिलेस बुधवारी गुन्हा दाखल करून सोडले. त्यानंतर संशयित कविता साळवेने इमारतीच्या अध्यक्षांसह इतर फ्लॅटधारकांना शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच 'आता मी पुन्हा वेश्याव्यवसाय करेल, कोणाला काय करायचे ते करा' असे दरडावत पोलिसांनाही घाबरत नसल्याचे सांगत पोलिसांनाही खुले आवाहन दिले.

रहिवाशांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

संशयित महिलेने दमदाटी, शिवीगाळ केल्याने इमारतीतील ६० ते ६९ रहिवाशांनी संतप्त होत आडगाव पोलिस ठाण्यात जात ठिय्या देऊन कठोर कारवाईची मागणी केली. तसेच संशयित महिलेस पोलिसांचा धाक नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

रहिवाशांचा आरोप

रोज महिलेच्या फ्लॅटमध्ये महिला व पुरुष येत. याबाबत तिच्याकडे चौकशी केल्यावर आम्ही व्याजाचा व्यवसाय करतो, त्यामुळे नागरिक येतात असे महिलेने सांगितले. तसेच मद्याच्या बाटल्या घराबाहेर ठेवणे, इमारतीत महिला बोलत असल्यास त्यांना हटकणे, येणाऱ्या ग्राहकांच्या वाईट नजरा यामुळे इमारतीतील महिला, मुलींना घराबाहेर पडणे अवघड झाले असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news