इगतपुरी : पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तालुक्यातील वासाळी येथील ३२ वर्षीय महिलेचा मृतदेह पिंपळगाव येथील बोरीची वाडी परिसर जंगलात कुजलेल्या अवस्थेत आढळला. तिचा प्रेमप्रकरणातून घातपात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
घोटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झुणकाबाई दशरथ भले (३२, रा. वासाळी) ही गेल्या पाच दिवसांपासून घरातून बेपत्ता होती. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल असल्याने शोध सुरू असतानाच शनिवारी (दि. 24) सायंकाळी तिचा मृतदेह पिंपळगाव येथील बोरीचा पाडा परिसरातील जंगलात आढळला. घोटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने आणि मृतदेह कुजलेला असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची चाैकशी केली जात आहे. दरम्यान, फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी केली आहे.