

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पर्जन्यात घट होण्याची शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेने पाणीबचतीसाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरातील पाणीपुरवठा शुक्रवार (दि. १६) पासून दररोज १० मिनिटांची कपात करण्यात येणार आहे. संभाव्य पाणीटंचाई टाळून उपलब्ध जलसाठा अधिक काळ टिकविण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकरսरीने करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या परिपत्रकानुसार, अल निनोच्या संभाव्य प्रभावामीवर उपलब्ध जलसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार दि. ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचा प्राधान्यक्रम आणि काटकरसरीने वापर करून पिण्याच्या पाण्याची उपलब्धता निश्चित करण्यावर भर देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील अनेक नळांना तोट्या नसल्यामुळे पाणीपुरवठ्याच्या वेळी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. नळांना तोट्या नसल्यास पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणे कठीण होते. त्यामुळे सर्व नळधारकांनी नळांना तातडीने तोट्या बसवून घ्याव्यात, असे आवाहन मनपाने केले आहे.
पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी नागरिकांनी या सूचनेचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर काही नागरिक घरासमोर तसेच सार्वजनिक रस्त्यावर पाणी सोडून देतात. काही ठिकाणी पिण्याचे पाणी गटारात वाहून जाते, तर त्याचा वापर वाहनांच्या धुण्यासाठीही केला जातो.
उपलब्ध जलसाठ्यावर संभाव्य ताण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, अशा प्रकारांना आळा घालण्याची गरज आहे. पिण्याचे पाणी रस्त्यावर किंवा गटारात सोडणे, वाहन धुण्यासाठी वापरणे अथवा अन्य कोणत्याही प्रकारे त्याचा अपव्यय करणे टाळावे. पाणीपुरवठ्याच्या वेळी आवश्यक तेवढे पाणी वापरून उर्वरित पाण्याची बचत करावी, असे आवाहन महानगरपालिकेडून नागरिकांना करण्यात आले आहे.
गळती तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश
नळांना तोट्या बसवणे, पाण्याची गळती आढळल्यास तातडीने दुरुस्ती करून घेणे आणि पिण्याच्या पाण्याचा वापर केवळ आवश्यकतानुसार करणे, या बाबांर नागरिकांनी भर द्यावा. पाणीबचत ही केवळ महानगरपालिकेची जबाबदारी नसून, ते प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करून भविष्यातही शहरवासीयांना पिण्याचे पाणी उपलब्ध राहावे, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
पाण्याचा अपव्यय; दंडात्मक कारवाई
पाणीपुरवठ्याच्या वेळी पाण्याचा अपव्यय करणाऱ्या आणि पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्या नळधारकांसह संबंधित नागरिकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, प्रकरणाचे स्वरूप आणि लागू कायदेशीर तरतुदीनुसार फौजदारी कारवाईही केली जाऊ शकते, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीबचतीसंदर्भातील सूचनेचे गांभीर्याने पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.