Nashik | नाशिकमधील ६०० रुग्णालयांची उद्यापासून तपासणी

अवैध गर्भपात केंद्र प्रकरणानंतर महापालिकेला जाग

Inspection of 600 hospitals in Nashik from tomorrow
नाशिकमधील ६०० रुग्णालयांची उद्यापासून तपासणीpudhari news network
Published on
Updated on

नाशिक : महात्मानगरसारख्या उच्चभ्रू वस्तीत अवैध गर्भपात केंद्र आढळल्याच्या तब्बल पंधरा दिवसांनंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला जाग आली असून, शहरातील सर्वच ६०० रुग्णालयांची बुधवार (दि.२५)पासून तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महापालिकेच्या ३८ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सहायक कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली असून, प्रत्येक पथकाला १५ रुग्णालयांची तपासणी करण्याचे टार्गेट देण्यात आले आहे.

एका मातामृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी वैद्यकीय विभागाचे पथक महात्मानगर येथील पंड्या हॉस्पिटलमध्ये गेले असता या रुग्णालयात अवैध गर्भपात केंद्र चालविले जात असल्याचे उघडकीस आले. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांचा साठाही आढळून आला. सदर रुग्णालयावर गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. सदर रुग्णालयाचे २००९ पासून परवाना नूतनीकरणही नाही. इतकी वर्षे अवैधरीत्या रुग्णालय चालविले जात असताना महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांना याबाबत माहिती कशी कळली नाही, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत असून, वैद्यकीय विभागातील अधिकारीही यानिमित्ताने संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. मुंबई शुश्रुषागृह अधिनियम १९४९ सुधारित नियम २००६ नुसार महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेले प्रत्येक रुग्णालय, नर्सिंग होम, शुश्रुषागृह यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नोंदणी करणे व दर तीन वर्षांनी नूतनीकरण करून घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, अनेक रुग्णालयांची नोंदणी बाकी असल्यामुळे तसेच रुग्णालयाच्या दर्शनीय भागामध्ये रुग्णहक्क सनद व उपचार दरपत्रक याची माहिती लावली जात नसल्यामुळे या संदर्भात झालेली टीका लक्षात घेता बुधवारपासून शहरांमधील ६०० रुग्णालयांची तपासणी केली जाणार आहे.

शहरातील सर्व रुग्णालये, प्रसूतिगृहे, गर्भपात केंद्रे, सोनोग्राफी केंद्रांची वैद्यकीय पथकांमार्फत तपासणी केली जाणार आहे. शासन नियमांनुसार सदर रुग्णालये, प्रसूतिगृहांची नोंदणीसह आवश्यक पूर्तता केली गेली आहे किंवा नाही, रुग्णालयात दर्शनी भागात रुग्णहक्क सदन व दरपत्रक लावले गेले आहे किंवा नाही याची तपासणी केली जाईल.

- डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news