नाशिक पुढारी ऑनलाइन- लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी जुन्या नाशकात मोठा राडा झाला होता. देवयानी फरांदे व वसंत गिते यांच्यात वाद झाला होता. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यामुळे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला होता. आता पुन्हा विधानसभेला त्याच ठिकाणी गिते व फरांदे समोरा-समोर आल्याचे पाहायला मिळाले.
आज मतदानावेळी जुन्या नाशकातील घासबाजार येथील शाळेच्या मतदान केंद्राबाहेर दोघेही पुन्हा आमने-सामने आले. लोकसभेला झालेल्या वादाची पुनरावृत्ती झाली. महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदे दाखल झाल्यावर त्यांनी लोकांशी बोलण्यास सुरुवात केली. त्याचवेळी महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते दाखल झाल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. वसंत गितेंच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी घोषणाबाजी झाली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून फरांदे यांना तिथून बाहेर काढले. त्यामुळे वादविवाद टळला.