पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
हिरावाडीतील अमृतधाम - तारवाला नगर लिंक रोडवर क्रेन आणि कार यांच्यात अपघात झाल्याची घटना शुक्रवारी (दि.2) रात्री उशिरा घडली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने काणेत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
तारवाला नगर सिग्नलकडून अमृतधामकडे जाणारी क्रेन क्रमांक एमएच ०४ डी टी ०८०१ ही हिरावाडीकडे जात होती. यावेळी वळण घेत असताना अमृतधामकडून तारवाला नगरकडे जाणाऱ्या ट्रकच्या दोरीमध्ये हुक अडकला. त्यावेळी ट्रक क्रेनला पुढे ओढून घेऊन गेला. यावेळी क्रेनचा ताबा सुटल्याने ट्रकच्या मागे अमृतधामकडून तारवाला नगरकडे जाणाऱ्या चारचाकी कारवर एमएच १५ इपी ४३९२ यावर क्रेन पलटी झाली. रस्त्याच्या मध्यभागी कारवर क्रेन पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत क्रेन आणि कार बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.