नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. २३) नाशिकमध्ये महिला सशक्तीकरण महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंचवटीमधील तपोवन मैदान येथे दुपारी २ ला मेळाव्यासाठी जिल्हाभरातून ५० हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचा अंदाज आहे.
राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून जिल्हानिहाय महिला सशक्तीकरण मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत नाशिकमध्ये महामेळावा घेण्यात येत आहे. महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांच्यासह अन्य प्रमुख मंत्र्यांची मेळाव्यासाठी उपस्थिती लाभणार आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली महामेळाव्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्हाभरातून या मेळाव्यासाठी महिला नाशिक शहरात दाखल होणार आहेत. त्यामुळे व्हीव्हीआयपींचा दाैरा व मेळाव्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेत पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात केले आहे.