पुढारी ऑनलाइन ; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच आता महायुतीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन युद्ध भडकण्याची चिन्ह दिसू लागली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच त्याचे संकेत दिले आहेत.
भुजबळांनी समीर भुजबळ यांना फेसबुकवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, समीर, नाशिक जिल्ह्यासह नांदगाव - मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी तुला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो असे म्हटले आहे. भुजबळांच्या या पोस्टने खळबळ उडवून दिली आहे. या पोस्टद्वारे भुजबळांनी थेट नांदगाव मनमाड मतदारसंघावर दावा केला आहे.
महायुतीमध्ये नांदगाव-मनमाड मतदारसंघ शिंदे गटाच्या वाट्याला आहे. तिथे शिंदे गटाचे सुहास कांदे हे विद्यमान आमदार आहेत. अशात भुजबळांनी या मतदारसंघासाठी समीर भुजबळांना शुभेच्छा दिल्याने या जागेवरुन संघर्ष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नांदगावची जागा नक्की कुणाला मिळणार हे पाहावे लागणार आहे.
छगन भुजबळ यांच्या या पोस्टला दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नांदगाव विधानसभेत सुहास कांदे आमदार आहेत. त्यामुळे असा दावा करणे योग्य नाही. लोकशाहीत सर्वांना अधिकार असला तरी नांदगावची जागा शिवसेनेकडे असल्याने ती जागा आमची आहे. आम्ही येवला मतदारसंघावर दावा केला तर चालेल का असा सवालच दादा भुसे यांनी भुजबळांना केला आहे.