

नाशिक : विधानसभा निवडणुकीत बुधवारी (दि. ३०) जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघातील अर्ज छाननीची प्रक्रिया पार पडली. एकूण ३३७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत तर विविध कारणांनी २५ उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. बाद ठरलेल्या अर्जांमध्ये सूचकांची स्वाक्षरी नसणे, अपूर्ण अर्ज, अनामत रक्कम पूर्ण भरलेली नसणे अशा विविध कारणांचा समावेश आहे. छाननीनंतर आता अवघ्या जिल्ह्याचे लक्ष सोमवारच्या (दि.४) माघारीकडे लागले आहे.
जिल्ह्यातील विधानसभेच्या पंधरा जागांसाठी रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यत ३५९ उमेदवारांनी एकूण ५०६ नामनिर्देशन पत्र दाखल केले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. पंधरापैकी तब्बल अकरा मतदार संघात महायुती व महाविकास आघाडीच्या बंडखाेरांनी अपक्ष अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे यंदा च्या निवडणुकीत रंगत भरली आहे.
पंधराही जागांसाठी दाखल अर्जांची छाननी प्रक्रिया त्या-त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पार पडली. त्यामध्ये ३३७ उमेदवारांचे ४४६ अर्ज हे छाननी प्रक्रियेवेळी वैध ठरले आहेत. तसेच २५ उमेदवारांचे ६० अर्ज हे विविध कारणांनी बाद करण्यात आले. इगतपूरी मतदारदारसंघातून काॅंग्रेसच्या उषा बेंडकोळी यांंनी पक्षाच्या नावे अर्ज दाखल केला होता. पण, अर्जासोबत एबी फॉर्मच नसल्याने त्यांचा अर्ज बाद ठरला आहे. नाशिक पूर्वत एका उमेदवाराने शेवटच्या क्षणी अर्जासोबत दहा हजारपैकी निम्मीच ५ हजार रुपये अनामत रक्कम भरली. त्यामुळे त्याचा अर्ज बाद ठरला. याशिवाय सूचकांच्या स्वाक्षऱ्या नसणे, अर्जात अपूर्णता असणे, आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर न करणे अशा कारणांमुळे अर्ज बाद करण्यात आले आहेत.
देवळालीत सर्वाधिक ६ उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. त्याखालोखाल नाशिक पूर्वत ४ तसेच नांदगाव व निफाडला प्रत्येकी ३ उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. दरम्यान, माघारीसाठी ४ नोव्हेंबरला दुपारी ३ पर्यंत अंतिम मुदत आहे. माघारीवरच जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातील लढतींचे चित्र अवलंबुन आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे बंडाेबांना थंड करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
मतदारसंघ- वैध उमेदवार- बाद उमेदवार
नांदगाव- 32- 03
मालेगाव मध्य-16- 02
मालेगाव बाह्य- 32- 00
बागलाण- 26- 00
कळवण-15- 01
चांदवड- 22- 00
येवला- 30- 01
सिन्नर- 22- 01
निफाड-17- 03
दिंडोरी- 21- 02
नाशिक पूर्व- 15- 04
नाशिक मध्य- 21- 01
नाशिक पश्चिम- 22- 00
देवळाली-18- 06
इगतपुरी- 28- 01
एकूण- 337- 25
जिल्ह्यात गुरुवारी (दि.३१) दिवाळीची स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पण निवडणूकचे कामकाज सुरु राहणार आहे. अर्ज छाननीअंती वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवाराची यादी बुधवारी (दि.३०) जाहीर करण्यात आली आहे. यामधून माघार घेऊ इच्छिणारे उमेदवार गुरुवारी कार्यालयीन वेळेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे माघार घेऊ शकतात, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी सांगितले आहे.