नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बहुप्रतीक्षित राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर जाहीर होण्याची शक्यता असून, यात भाजपकडून माजी आमदार बाळासाहेब सानप, आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले तसेच शिवसेना शिंदे गटाकडून उपनेते अजय बोरस्ते यांची नावे चर्चेत आहेत.
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत भाजपच्या सहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तीन, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांचा समावेश असेल. यापूर्वी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने आमदारांची यादी निश्चित करून ती तत्कालीन राज्यपालांकडे पाठवली होती. मात्र, राज्यपालांनी या यादीच्या मंजुरीला विलंब केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. राज्यात जुलै २०२२ मध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर आधीच्या आमदारांची यादी आपोआपच निकाली निघाली. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीआधी या जागांवर नियुक्ती व्हावी, यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. महायुतीतील घटक पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची यादी अंतिम केली जात आहे. विधानसभा निवडणुकीला फायदा होईल अशाच पद्धतीने ही १२ नावे निश्चित केली जाणार आहेत. त्यामुळे विशिष्ट समाजाचे नेतृत्व करणारे पदाधिकारी, निवडणुकीसाठी रणनीती करण्यासाठी मदत करणारे, तसेच आक्रमक प्रचार करणारे पदाधिकारी आदींची निवड केली जाणार असल्याचे समजते.
भाजपकडून नाशिक पूर्व मतदारसंघातील माजी आमदार बाळासाहेब सानप, आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्यासह महिला आघाडीच्या चित्रा वाघ, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, माजी आमदार सुधाकर कोहळे यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेकडून उपनेते अजय बोरस्ते, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार मनीषा कायंदे, माजी खासदार राहुल शेवाळे यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी अजित पवारकडून मुंबई बँकेचे सिद्धार्थ कांबळे, रूपाली चाकणकर, माजी आमदार बाबा सिद्दिकी आणि माजी खासदार आनंद परांजपे ही नावे चर्चेत आहेत.