इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा : इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण छगन भुजबळ आले होते. मात्र कार्यक्रम संपल्यावर पुन्हा नाशिकला जात असताना वाडीव-हे परिसरात काही अज्ञातांनी भुजबळ जात असलेल्या रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला.
जालना येथे शुक्रवारी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर टीका केल्यामुळे मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. कार्यक्रम संपल्यानंतर ना. छगन भुजबळांचा ताफा कार्यक्रमा स्थळापासून ८ किलोमीटर पुढे आल्यावर रस्त्याच्या कडेला शेतात लपून बसलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी रस्त्यावर येत टायर पेटवून भुजबळांचा निषेध व्यक्त केला. तसेच सांजेगाव व भंबाळे फाट्यावर मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर जमा होत भुजबळांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.
मात्र, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे व उपअधीक्षक सुनील भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहायक पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. येत्या २२ तारखेला इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथे मनोज जरांगे पाटलांची ११० एकर क्षेत्रावर जाहीर सभा होणार आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यात वातावरण ढवळून निघणार आहे.
हेही वाचा