

नंदुरबार : मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये काही बालकांच्या मृत्यूशी संबंधित गंभीर घटना उद्भवल्यानंतर, राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने नंदुरबार जिल्ह्यात तातडीने सतर्कता घेण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष बॅच SR-१३ च्या ‘कोल्ड्रिफ सिरप’च्या वापरास प्रतिबंध घालण्याबाबत तसेच त्याचा साठा विक्रीस न ठेवता वेगळा करण्याबाबत जनतेला आणि विक्रेत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. ही माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अश्विनी जमादार यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
सदर सिरप, मे 2025 मध्ये निर्मित, एप्रिल 2027 पर्यंत वैध असून, मे. खेसन फर्मा, कांचीपुरम (तामिळनाडू) यांच्याद्वारे उत्पादित केलेले आहे. तपासात या बॅचमध्ये डायइथिलीन ग्लायकोल (Diethylene Glycol - DEG) नावाचा विषारी घटक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता या औषधाचा वापर तत्काळ थांबवावी. जर औषध कोणाकडे उपलब्ध असेल तर नंदुरबार अन्न व औषध प्रशासन कार्यालयास त्वरित कळवावे. सर्व औषध विक्रेते, वितरक आणि रुग्णालयांनी सदर बॅच SR-१३ चा साठा वेगळा करावा आणि वितरण न करता संबंधित कार्यालयास माहिती द्यावी.
राज्यातील वितरण आणि साठ्याचा मागोवा घेण्यासाठी महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तामिळनाडू औषध नियंत्रण विभागाशी समन्वय साधत आहेत. विक्रेते, वितरक आणि रुग्णालयांना सदर बॅच सापडल्यास, त्याचे वितरण थांबवून साठा गोठवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत, असे सहायक आयुक्त जमादार यांनी सांगितले आहे.