जळगांव : गेल्या दोन-तीन दिवसापासून जळगाव जिल्ह्यात पावसाची संतधार सुरू आहे. यामुळे पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या लखपती दीदीच्या कार्यक्रमा पूर्वीच पाण्याने पूर्ण सभामंडप व्यापला असून जागोजागी मंडपातील पाणी काढण्यासाठी जेसीबीच्या माध्यमातून साऱ्या खोदण्यात येत आहे.
प्रशासन त्या ठिकाणी जमीन चिखलमय होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी केंद्रीय वरिष्ठ अधिकारी आयुक्त व जिल्हाधिकारी हे जातीने त्या ठिकाणी पाहणी करीत आहे. ना. गिरीश महाजन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सुद्धा त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे.
जळगाव जिल्ह्यात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होणार आहे. उद्या (दि. 25) रोजी लखपती दीदी या कार्यक्रमाचे आयोजन जळगाव विमानतळ समोरील प्राईम इंडस्ट्रियल पार्क या ठिकाणी करण्यात आले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने वॉटरप्रूफ मंडपाची सोय त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे . दि. 24 रोजी तर सकाळपासून सूर्यदर्शनही झालेले नाही पाऊस सतत सुरू असल्याने प्राईम इंडस्ट्रीज पार्क या ठिकाणी पाणीच पाणी झालेले आहे. सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने मंडपातही पाणीच पाणी झालेले आहे. काही ठिकाणी वॉटरप्रूफ मंडपालाही गळती लागलेली आहे.
कार्यक्रमाला पंतप्रधान येणार असल्याने जिल्हा प्रशासन तसेच केंद्रीय अधिकाऱ्यांची चांगली धावपळ सकाळपासून उडालेली आहे. मैदान कोरडे करण्यासाठी 25 जेसीबी 50 डंपर 15 रोडरोलर व अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत.
याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की त्या ठिकाणी सखल भाग आहे त्यामुळे पाणी जास्त वेळ थांबणार नाही तसेच त्या ठिकाणी खडी टाकण्यात आलेली आहे व ज्या ठिकाणी पाणी थांबेल किंवा वाहत असेल त्या ठिकाणी उद्याच्या कार्यक्रमासाठी पूर्वी त्या ठिकाणी ब्रिजेस टाकण्यात येतील त्यामुळे पाणी थांबण्याचा प्रश्न येत नाही.