जळगाव : आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांना केले स्थानबद्ध
जळगाव : गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील रेकॉर्डवरील तीन गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवार (दि.27) रोजी स्थानबध्दतेच्या कारवाईचे आदेश काढले. जळगाव एमआयडीसी, यावल आणि फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिन्ही गुन्हेगारांवर वेगवेगळ्या कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कळविले आहे.
या तिघांना केले स्थानबद्ध
जळगाव शहरातील आकाश उर्फ खंड्या सुकलाल ठाकूर (वय-२४, रा. तुकाराम वाडी, जळगाव) याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात वेगवेगळे स्वरूपाचे ७ गुन्हे दाखल आहेत.
यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकाश मधुकर बिऱ्हाडे (वय-२२, रा. सिद्धार्थ नगर, यावल) याच्यावर १० वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रवीण उर्फ डॉन गोपाळ तायडे (वय-२८, रा. पाडळसा ता. यावल) याच्यावर तब्बल १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
तिघांवर यापूर्वी पोलीसांकडून नोटीसा बजावण्यात आलेल्या होत्या. परंतु तिघांमध्ये कोणत्याची प्रकारची सुधारणा होत नव्हती. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी त्यांच्यावर अंकुश लावण्यासाठी एमपीडीए कायद्यांर्गत कारवाई करत स्थानबध्द करण्यात यावे असा प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे सादर केला. त्यानुसार तिघांच्या प्रस्तावाचे अवलोकन करून मंजूरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवार (दि.27) रोजी सकाळी ११ वाजता प्रस्तावाला मंजूरी दिली. त्यानुसार रेकार्डवरील गुन्हेगार आकाश उर्फ खंड्या सुकलाल ठाकूर याला नागपूर कारागृहात तर आकाश बिऱ्हाडे आणि प्रवीण उर्फ डॉन तायडे या दोघांना मुंबई मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.