जळगाव : पुढारी वृत्तसेवा : भुतान येथे स्वस्त सोने मिळत असल्याचे आमिष दाखवून २ लाख ७० हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी नया भारत हॉलीडे या इंटरनॅशनल टुरिस्ट कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अमळनेर येथील शैलेश शहा, ज्योती शहा या दांपत्याने अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. कल्पेश बाबुलाल पनारा असे कंपनीच्या मालकाच्या नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अमळनेर येथील शहा दांपत्याने नया भारत हॉलीडे या कंपनीची जाहिरात फेसबुकवर बघून नेपाळ आणि भुतान ट्रीप बुक केली होती. भुतान येथे सोने २७ हजारला तोळे मिळत असल्याची माहिती कंपनीचे मालक कल्पेश याने शहा यांना दिली. त्यानंतर भुतान येथे जाण्यासाठी दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी १ लाख ५ हजारांमध्ये टुर बुक केली. ५ हजार कल्पेश याच्या फोन पेवर पाठविले.
दरम्यान, ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी कल्पेश याने ज्योती शहा यांना फोन करून सांगितले की, भुतान या देशात सोन्याचा भाव २७ हजार रुपये तोळे आहे. तसेच सोने दराचे फोटो पाठविले. तुम्ही आम्हाला लवकरात लवकर पैसे पाठवा, तेथे आमचे एजंट तुमचे सोने बुक करुन ठेवतील. व तुम्ही टुरला आल्यावर तुमचे सोने तुमच्या ताब्यात देऊ, असे सांगितले. यावर विश्वास ठेऊन शहा दांपत्याने ४ नोव्हेंबर २०२३ रोजी कल्पेश याच्या अॅक्सीस बँकेच्या खात्यावर २ लाख ७० हजार जमा करून १० तोळे सोने बुक केले. त्यानंतर कल्पेश याने टुर च्या शेवटच्या दिवशी तुम्हाला तुमचे सोने दिले जाईल, तुम्ही काळजी करु नका, असे सांगितले.
भुतान येथे गेल्यानंतर कल्पेश याला फोन करून सोन्याबाबत विचारले असता टुर च्या शेवटच्या दिवशी तुम्हाला तुमचे सोने भेटून जाईल, तुम्ही काळजी करु नका, असे शहा दांपत्याला सांगितले. त्यानंतर टुरच्या शेवटच्या दिवशी त्याला पुन्हा फोन करून विचारपूस केली असता त्याने सांगितले की, तुमचे सोने काही मिळालेले नाही. तुम्ही तुमचे गावी अमळनेर येथे परत जा. मी तुमचे २ लाख ७० हजार रुपये तुम्हाला परत देतो, असे सांगितले. दरम्यान, आतापर्यंत त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शहा दांपत्याने अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल केला.