जळगाव : शहरातील नुतन मराठा महाविद्यालय परिसरात कोचींग क्लासला जात असलेल्या बारावीतील विद्यार्थिनीचा एका मुलाने पाठलाग करून तिला लग्नाची मागणी घातली. विद्यार्थिनीने लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन मुलाने तिला धक्काबुक्की करत तिचा विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि.२८) सकाळी आकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुरूवारी (दि.२९) रात्री जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी , शहरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही बारावीचे शिक्षण घेत आहे. तिने नुतन मराठा महाविद्यालयाच्या परिसरातील एका ठिकाणी खासगी कोचिंग क्लास लावलेला आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ती कोचींग क्लाससाठी जात असताना १७ वर्षीय मुलाने तिचा पाठलाग करून तिला लग्नाची मागणी घातली. पिडीत मुलीने लग्नास नकार दिल्याने रागातून त्याने तिच्यासोबत धक्काबुक्की करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पिडीत मुलीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिरा देशमुख ह्या करत आहेत.