धुळे : गणेशोत्सव हा देशभरात जल्लोषात व उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे. यावर्षीही सर्व गणेशमंडळांनी गणेशोत्सव उत्साहात व शांततेत साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज शांतता समितीची बैठक जिल्हा नियोजन सभागृह येथे झाली. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, परिविक्षाधिन अधिकारी डी. सर्वानंद यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, गणेशोत्सव हा सर्वांचा आवडता सण आहे. हा सण सर्वजण जल्लोषात व उत्साहात साजरा करतात. यावर्षीं देखील गणेशोत्सव साजरा करतांना कुठलाही अनुचित प्रकार न घडता उत्साहात आणि शांततेत साजरा करावा. नागरिकांना ध्वनीप्रदुषणाचा त्रास होवू नये यासाठी डीजेचा वापर न करता पारंपारिक वाद्यांचा वापर करावा. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी घरगुती व गणेश मंडळांनी शाडू मातीच्या गणेशमुर्तींची स्थापना करावी. जास्त उंचीच्या गणेशमुर्तीची शक्यतो स्थापना करु नये. केल्यास मंडळांनी आवश्यक ती खबरादारी घ्यावी. दर्शनासाठी येणाऱ्या व जाणाऱ्या महिला व पुरुषांसाठी स्वतत्र व्यवस्था करावी. दर्शनावेळी जास्त गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. गणेशमंडळांनी व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम, आरोग्यविषयक उपक्रम, शासकीय योजनांवर आधारित देखावे, रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्ड्यांची डागडूजी करावी, गणेश मिरवणुक तसेच विसर्जन मार्गावरील विद्युत तारा तसेच झाडांचा फाद्याबाबत काळजी घ्यावी. उत्सवकाळात वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी विद्युत विभागाने दक्षता घ्यावी. गणेशमंडळांना आवश्यक त्या परवानगीसाठी एक खिडकी योजना राबवावी, गणेशमंडळांना कोणतीही अडचण होणार नाही याची काळजी जिल्हा प्रशासनामार्फत घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीस स्टेशन यांची किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. या स्पर्धेत राज्यातील पहिल्या तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळाना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार असल्याने गणेशमंडळांनी 31 ऑगस्टपुर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पोलीस अधिक्षक धिवरे म्हणाले की, मागील काही वर्षांपासून आपल्या जिल्ह्यात व शहरात गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यात येत आहे. हाच पायंडा यावर्षीही पाळण्यात यावा. गणेशोत्सव साजरा करतांना कुणाचीही भावना दुखावणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. सोशल मीडियावर तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करु नयेत. मंडळाच्या पार्किंग व्यवस्थाच्या ठिकाणी स्वयंसेवक नेमावेत. मोठ्या मंडळांनी मंडपाच्या ठिकाणी सीसीटिव्ही लावावेत. विसर्जनाच्या ठिकाणी स्वंयसेवकांची नेमणूक करावी. महिला, भगिनींची अधिक काळजी घेण्याची दक्षता घ्यावी. गणेशोत्सवात गर्दीच्या व इतर ठिकाणी ड्रोनची मदत घेण्यात येणार असून आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी एसआरपीएफच्या दोन कंपनी तसेच 800 होमगार्डचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मागील वर्षी 22 गावांत एक गाव, एक गणपतीची स्थापना केली होती. यावर्षीदेखील जास्तीत जास्त गावांमध्ये एक गाव, एक गणपती संकल्पना राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.
महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील म्हणाल्या की, आगामी गणेशोत्सवानिमित्त महापालिकेमार्फत आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी महापालिकेतील सर्व विभागांना आदेश देण्यात आले आहेत. लवकरच गणेशमंडळांना परवानगी देण्यासाठी एक खिडकीची स्थापना करण्यात येईल. गणपती आगमन व विसर्जन स्थळावरील खड्डे, साफसफाई, रस्यांवरील बंद पथदिवे बसविण्यात येतील. विसर्जनस्थळी निर्माल्य, घरगुती गणपती मुर्तीदानासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील जाहिरात फलकांची पाहणी करुन ते काढण्यात येतील. नवीन जाहिरात फलक लावण्यासाठी परवानगी देण्यात येईल. उत्सवाच्या काळात मोकाट जनावरांमुळे होणारी अडचण दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.