पिंपळनेर, जि.धुळे : जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित (पेसा) क्षेत्रातील कंत्राटी पदभरती रद्द करून आदिवासी समाजाच्या 12 हजार 500 पदांची भरती करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी आदिवासी (पेसा) संघर्ष समितीच्या वतीने आज शेवाळी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दोन तासांहून अधिक काळ सुरु असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर 5 कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
आदिवासी (पेसा) संघर्ष समितीच्या वतीने दि.17 ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते. तसेच शासनाने दखल न घेतल्यास दि.21ऑगस्ट रोजी रास्ता रोको करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. त्यानुसार आज समितीचे अध्यक्ष सुरेश पवार यांचे नेतृत्वात साक्री तालुक्यातील आदिवासी (पेसा) संघर्ष समितीच्या वतीने आज शेवाळी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
अनुसूचित (पेसा) क्षेत्रातील 17 संवर्ग पदभरती सुरू करून पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी, अनुसूचित(पेसा) क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेतील कंत्राटी पदभरती तात्काळ बंद करण्यात यावी, आदिवासी समाजाच्या 12 हजार 500 पदांची पदभरती तात्काळ सुरू करावी व आदिवासी विकास विभाग अंतर्गत साक्री तालुक्यातील रोहोड येथील मिनी किचन शेड कार्यान्वित करू नये,या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामुळे शेवाळी ते नेर दरम्यान वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. या रास्तारोको आंदोलनात साक्री तालुक्यातील अनुसूचित (पेसा) क्षेत्रातील सर्व 118 ग्रुप ग्रामपंचायत, 38 स्वतंत्र महसूल गावे, 202 गाव,वाडे,पाडे येथील आदिवासी लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.