धुळे : धुळ्यातील देवपूर परिसरातील कुख्यात गुन्हेगार नरेश गवळी याला एमपीडीए अंतर्गत एका वर्षासाठी नाशिक येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. गवळी याच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे दहा गुन्हे दाखल असून यापूर्वी त्याला हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव देखील पाठवण्यात आला होता.
देवपूर नगाव बारी चौफुली परिसरात राहणारा नरेश कांतीलाल गवळी (यादव) यांच्याविरुद्ध धुळे शहरातील देवपूर, पश्चिम देवपूर ,चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे म्हणजेच खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, विनयभंग, दंगल, लुटमार करणे, खंडणी वसूल करणे ,ब्लॅक मेलिंग अशा प्रकारचे दहा गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात पाच वेळा सीआरपीसी कलम 110 अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती. तर त्याला दोन वेळा धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तरी देखील त्याच्या वर्तनुकीवर कोणतीही सुधारणा होत नसल्याने तो समाजात धोकादायक व्यक्ती म्हणून ठरला होता. त्याचप्रमाणे नरेश गवळी यांनी देवपूर परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाचे घर हडप करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्या विरोधात देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या कार्यालयात सादर केला होता. त्यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या कडे गेला. यानंतर तो प्रस्ताव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाचे अवलोकन करून पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला होता.
त्यानुसार आज या गुन्हेगाराला एम पी डी ए अंतर्गत स्थानबद्ध करण्याचा आदेश करण्यात आला आहे. त्याची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या गुन्हेगाराने गेल्या पाच ते सहा वर्षांपासून गुन्हेगारांची टोळी करून देवपूर परिसरात मोठी दहशत निर्माण केली होती. या प्रकारची कारवाई यावर्षी धुळे जिल्ह्यात दुसऱ्यांदा होत असून या जोरदार कारवाईमुळे धुळ्यातील गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण होणार आहे. यातून गुन्हेगारी आटोक्यात येण्यासाठी मदत होईल.