दंगली घडवण्याच्या उद्देशाने प्रक्षोभक बोलणाऱ्या आमदाराला सरकारचा पाठिंबा : जयंत पाटील

धुळ्यात शिव स्वराज्य यात्रेचे आगमन
Jayant patil
जयंत पाटील यांचे सरकारवर आरोपPudhari Photo
Published on
Updated on

धुळे : राज्यात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे मोठे षडयंत्र सुरू आहे. सत्तेतील काही आमदार प्रक्षोभक बोलतात. तर त्यांना सरकारमध्ये बसलेल्या नेत्यांचा पाठिंबा आहे. पण राज्यात दंगली करून सत्तेवर येण्याची ही पद्धत आता जुनी झाली आहे. महाराष्ट्रातील हिंदू मुस्लिम समाज हा हुशार असून दंगली घडवण्याच्या प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तीला तो भिक घालणार नाही, असा विश्वास आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

धुळे येथील हिरे भवनात आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रेचे आगमन झाले. यावेळी खासदार अमोल कोल्हे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्यासह महानगर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले, ग्रामीण जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, माजी महापौर कल्पना महाले, कामराज निकम, जोसेफ मलबारी, माजी नगरसेवक संजय पाटील, गोरख शर्मा, शकीलाबक्ष आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना रोहिणी खडसे यांनी लाडकी बहीण योजनेचा समाचार घेतला. सरकारमधील तीनही पक्ष लाडकी बहीण योजनेचा श्रेय घेण्यासाठी धडपड करीत आहेत. पण राज्यात वाढणारी महागाई, महिलांवर होणारे अत्याचार ,इंधन दरवाढ, बेरोजगारी ,शेतकरी आत्महत्या याचे श्रेय देखील सत्तेतील तिघाही पक्षांनी घेतले पाहिजे. असा टोला त्यांनी लावला.

त्यानंतर बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले की, राज्यातील चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक इतर राज्यात पळवली आहे. वेगवेगळ्या योजनांच्या जाहिरातींवर सरकारने 270 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. हा सर्व खर्च जाहिरात करणाऱ्या सरकारमधील नेत्यांच्या खिशातून खर्च होत नसून जनतेच्या वेगवेगळ्या कर वसुली मधून केला जातो आहे. विशेष म्हणजे सरकारच्या योजनांची प्रसिद्धी करण्यासाठी दहा हजार रुपये महिन्याने सहा महिन्यांसाठी योजना दूत आणण्याची योजना आणली गेली. यासाठी देखील तीनशे कोटी रुपयाचा खर्च होणार आहे. राज्याच्या तिजोरीची होळी करून सत्तेची दिवाळी करण्याचा प्रकार हे सरकार करीत आहे. राज्यातील कंत्राटदारांची 36 हजार कोटी रुपयांची बिले थकली आहे. या सर्व प्रकाराबाबत सरकारने श्वेतपत्रिका काढली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

दीड फुटाचा आमदार असल्याची टीका

यावेळी बोलताना मेहबूब शेख यांनी महायुती सरकारवर टीका केली. या सरकारने ओबीसी मराठा वाद लावला. आता हिंदू मुस्लिम वाद लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. एक दीड फुटाचा आमदार मुस्लिम समाजावर वाईट बोलतो. हे सर्व ठरवून चालले आहे. महागाई बेरोजगारीवर दीड फुटाचा आमदार काहीच बोलत नाही. पण तेढ निर्माण होईल, असा प्रयत्न तो करतो आहे, अशी टीका शेख यांनी कुणाचेही नाव न घेता केली आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात आहेत. सर्वच गुजरातला नेणार असेल तर मत देखील गुजरात मधूनच मागितले पाहिजे, असा टोला त्यांनी लावला. ज्यांनी स्वतःच्या बहिणीला निवडणुकीत छळले जे स्वतःच्या बहिणीचे झाले नाही, ते राज्यांच्या बहिणीचे काय होतील अशी टीका देखील यावेळी त्यांनी केली.

राज्यातील त्रिकूट घालवले पाहिजे

त्यानंतर बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, या राज्यातील त्रिकूट घालवले पाहिजे .राज्यातील कंत्राटदारांची थकबाकी पाहता भविष्यात कंत्राटदारांची आत्महत्या होण्याच्या घटना दिसून येतील. येणाऱ्या विधानसभेमध्ये राज्यात परिवर्तन होईल, असे चित्र आहे. लूट करणारे सरकार जनता घालवणार आहे. पण राज्यात मोठे षडयंत्र सुरू आहे. दोन समाजांमध्ये दंगली करण्याचे कट कारस्थान केले जाते आहे. धुळ्याच्या दोंडाईचा शहरात झालेल्या दंगल प्रकरणात ज्यांच्या हातात दगड आणि दांडके होते.त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. मात्र घटनास्थळावर नसलेल्या तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हा प्रकार चुकीचा आहे, असे त्यांनी सांगितले. धुळे शहरातून सक्षम आणि नवा चेहरा पुढे करू असे सांगत असतानाच भ्रष्ट सरकार बाजूला करण्याचे काम जनतेने करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news