

पाथर्डी तालुका : करंजी घाटात मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता मुंबईहून परभणीकडे वीस हजार लिटर पेट्रोल घेऊन जाणारा टँकर ब्रेक फेल झाल्याने माणिकशहा पीरबाबा दर्ग्याजवळ धोकादायक वळणावर पलटी झाला. या अपघातामुळे एका कारचे देखील नुकसान झाले आहे. पेट्रोलचा टँकर पलटी झाल्याची माहिती समजताच टँकर मधून पेट्रोल घेऊन जाणाऱ्या तरुणांची देखील मोठी गर्दी अपघातस्थळी झाली.
पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस महामार्ग विभागाचे पोलीस अधिकारी, कर्मचारी काही वेळात घटनास्थळी दाखल झाले. अहिल्यानगर व पाथर्डी येथून अग्निशमन दलाच्या दोन गाडया देखील घटनास्थळी बोलवण्यात आल्या होत्या. पोलीस सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीश भोये, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक हरिभाऊ दळवी, भगवान टकले, ईश्वर बेरड, संजय राठोड, अक्षयसिंह वडते दुर्योधन म्हस्के,यांच्यासह राज्य मार्ग पोलीस विभागाचे पोलिस उपनिरीक्षक बबन राठोड, सहाय्यक फौजदार राजू काळे, हेडकॉन्स्टेबल देविदास खेडकर, राहुल भडांगे, बाबासाहेब जरे, महेश सावंत, संतोष टेकाळे यांच्यासह अनेकांनी यावेळी मदत करून वाहतूक सुरळीत केली.
धोकादायक वळणावर टँकर पलटी झाल्याने करंजी घाटात सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातामध्ये मकबल पठाण (रा. पिंपळगाव सय्यद मिया, जि. परभणी) हा टँकर चालक गंभीर जखमी झाला आहे. करंजी घाटात अपघाताची मालिका कायम सुरू आहे. या अपघातांच्या घटनेमध्ये जड वाहनांचा सर्वाधिक समावेश आहे. धोकादायक वळणावर लवकरात लवकर पर्यायी मार्ग काढावा अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे. ओम पालवे, प्रदीप पालवे यांनी हि घटनास्थळी मदत केली.