नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावर टीका करताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वक्तव्य केले आहे. भुसे यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला. राऊत यांनी केलेल्या वक्तव्याची कीव करावी वाटते, वारकऱ्यांबद्दल असे बोलणे चुकीचे आहे, असे म्हणत भुसे यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला.
त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे मंत्री भुसे यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या वक्त्तव्याचा समाचार घेतला.
माध्यमांशी संवाद साधताना मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनावर भुसे यांनी भाष्य केले. ओबीसी आंदोलनकर्त्यांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला एक्स्ट्राचे आरक्षण दिले जात असेल तर त्यात काहीही गैर नाही, असा दावा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केला आहे. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.
आरक्षणाचा संपूर्ण अभ्यास करून कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दिलेले आरक्षण योग्य आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे आरक्षण देताना कोणत्याही समाजाचे आरक्षण एक टक्का देखील कमी झालेले नाही. त्यामुळे वाद होण्याची शक्यता नाही. सभागृहांमध्ये एक मतांने हा ठराव पारित झाला आहे, असेही भुसे यांनी स्पष्ट केले.
पालखी सोहळ्याविषयी भुसे म्हणाले की, संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे. पंढरपूरपर्यंत ही पालखी जाते. हजारो वारकरी या पालखीत सहभागी झाले आहेत. येणाऱ्या काळात चांगला पाऊस येऊ दे. बळीराजाला कष्टकऱ्याला न्याय मिळू दे, अशी प्रार्थना मी देवाकडे केली आहे, असे त्यांनी सांगितले. शक्तिपीठाचा महत्व त्या-त्या भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. त्या भागातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी, त्याचे म्हणणे ऐकून घेऊ. त्यांचे समाधान केल्याशिवाय पुढे मार्गक्रमण होणार नाही. असा शब्द शेतकऱ्यांना देतो, असे नमूद करत भुसे यांनी शक्तिपीठ मार्गावरही प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा –