नाशिक : पुढारी वृत्तसेवा- खासगी सावकार वैभव देवरे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने रविवारी (दि. २१) त्यास जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याची रवानगी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. देवरेसह त्याची पत्नी, नातलग व इतरांविरोधात जबरी चोरी, सावकारी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
दरमहा दहा टक्के व्याजदराने कर्जवाटप करून खासगी सावकार वैभव देवरे याने अवाच्या सवा दराने कर्जवसुली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. दमदाटी, धमकावत त्याने कर्जदारांकडून १० पटींहून अधिक रक्कम वसूल केली. तसेच कर्जदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या स्थावर-जंगम मालमत्ता बळकावल्या. याप्रकरणी सुरुवातीस इंदिरानगर पोलिस ठाण्यात विजय खानकरी यांच्या फिर्यादीनुसार, देवरे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. त्यात देवरेस रविवार (दि.२१)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्यास पुन्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, वैभवसह इतरांविरोधात चार गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी वैभवसह इतरांची अटक करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. त्यामुळे इंदिरानगर पोलिस वैभवचा ताबा पुन्हा घेण्याची शक्यता आहे.
हेही वाचा –