चैत्र महिन्यात डोक्यावर पाण्याचा ‘एकच हंडा’, नाशिक जिल्ह्यातील ‘या’ गावात अनोखी परंपरा

सुपलीची मेट येथे डोक्यावर एक हंडा घेऊन पाणी वाहताना महिला(छाया : गणेश सोनवणे)
सुपलीची मेट येथे डोक्यावर एक हंडा घेऊन पाणी वाहताना महिला(छाया : गणेश सोनवणे)
Published on
Updated on

महाराष्ट्रात पूर्वापार चालत आलेल्या अनेक रुढी परंपरा आजही लोक जपताना आपल्याला दिसतात. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात ब्रम्हगिरी पर्वताच्या कुशीत असलेले सुपलीची मेट या गावात अशीच एक पूर्वापार चालत आलेली पंरपरा आजही येथील आदिवासी बांधव जपताना दिसतात. ऐरवी डोक्यावर दोन-तीन हंडे घेऊन पाणी वाहणाऱ्या येथील महिला चैत्र महिन्यात डोक्यावर केवळ एकच हंडा घेऊन पाणी वाहतात. चैत्र महिन्यात पंधरा दिवस येथे डोक्यावर दुसरा हंडा घेतलेला चालत नाही. या मागे या लोकांची एक वेगळी श्रद्धा आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात मेटघर किल्ला ग्रामपंचायत अंतर्गत येणारे सुपलीची मेट हे अवघे 84 उंबऱ्याचे गाव आहे. सुमारे 400 ते 500 आदिवासी बांधव इथे राहतात. मेट म्हणजे वस्ती. मेटघर किल्ला ग्रामपंचायत अंतर्गत ब्रम्हगिरी पर्वताच्या कुशीत अशा पाच मेट आहेत. त्यातीलच सुपलीची मेट एक आहे. येथे पाण्याचे मोठे दुर्भीक्ष आहे. दोन-ते तीन किलोमीटर पायपीट करुन महिलांना पाणी आणावं लागतं. पण, अशा परिस्थितही श्रद्धेपोटी इतक्या लांब जावूनही डोक्यावर एकच हंडा घेऊन पाणी वाहताना या महिला दिसतात.

नेमकी काय आहे ही परंपरा?

चैत्र महिन्याचे पंधरा दिवस गावातील बायका डोक्यावर एकच हंडा घेऊन पाणी वाहतात. गावात कोणीही या काळात मांसाहार करत नाही. मंगळवारी घरातील कोणीही कामावर जात नाही. कामाला सुट्टी असते. गावातील लोकांची येथील मरई आईवर श्रद्धा आहे. मरई आईला या दिवसात नवस केला जातो. हनुमान जयंतीच्या दिवशी हा नवस पूर्ण करुन मगच गावातील महिला डोक्यावर दुसरा हंडा घेतात. वर्षभर आम्हाला सुखी व समाधानी ठेव. गावावर कोणतेही विघ्न येऊ देऊ नको असे साकडे मरई आईला हे आदिवासी लोक घालतात.

ब्रम्हगिरीच्या कुशीत वसलेलं हे गाव भुस्खलनाच्या छायेत आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथे दरड कोसळण्याची भिती असते. म्हणून वर्षभर कोणतेही विघ्न नको म्हणून हे लोक मरई आईला नवस करुन तो पूर्ण करतात. नवस पूर्ण झाल्यावरच येथील महिला डोक्यावर दुसरा हंडा घेतात.

गावात भीषण दुष्काळ

गावातील महिलांना बाराही महिने पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. सारा दिवस पाण्याभोवतीच महिलांचा जातो. सध्या उन्हाळ्यात तर भीषण पाणीटंचाईचा सामना या लोकांना करावा लागतो आहे. गावातील विहीरीही आटून गेल्या आहेत. चैत्रातील पंधरा दिवस वगळता वर्षभर गावातील महिला डोक्यावर दोन-दोन तीन-तीन हंडे घेऊन पाणी वाहताना दिसतात. पाणी संघर्ष जणू या लोकांच्या पाचवीलाच पूजलेला आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news