मनमाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांना गुरुवारी (दि. २९) रात्री मनमाडला भीमसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. भिडे गुरुजी नेहमी संविधान, दलित समाज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत वादग्रस्त विधान करतात, असा आरोप करत भीमसैनिकांनी त्यांची गाडी अडवून त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती. त्यांनी भीमसैनिकांच्या गराड्यातून भिडे गुरुजींचे वाहन बाहेर काढून त्यांना धुळ्याकडे रवाना केले. या प्रकरणी पोलिसांनी १० ते १५ भीमसैनिकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, भिडे गुरुजी हे येवला येथून कार्यक्रम आटोपून मनमाडला आले होते. कॅम्प भागातील अयोध्यानगरमध्ये त्यांच्या उपस्थितीत हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर ते धुळ्याकडे जात असताना चौफुलीवर भीमसैनिकांनी त्यांची गाडी अडवली. संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. यामुळे पोलिसांची एकच तारांबळ होऊन गोंधळ उडाला. पोलिसांनी निदर्शकांना बाजूला केल्यानंतर भिडे गुरुजी धुळ्याकडे रवाना झाले. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी मनमाडला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या ठिकाणी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, राजेंद्र आहिरे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, गोंधळ घालणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :