नाशिक : पुढारी वृत्तसेवा- माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील कॉंग्रेसचे प्रमुख नेते अशाेक चव्हाण यांनी आमदारकीसह कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत राज्यातील कॉंग्रेसचे काही आमदार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर दैनिक 'पुढारी'ने उत्तर महाराष्ट्रातील कॉंग्रेस आमदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता चारही आमदारांनी कुठलीही ठाेस भूमिका व्यक्त केली नाही. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील आमदार चव्हाण यांच्यासोबत जाण्याबाबत संभ्रमावस्था असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उत्तर महाराष्ट्रात कॉंग्रेसचे चार आमदार आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मदारसंघातील आ. हिरामण खोसकर 5 फेब्रुवारीपासून परदेश अभ्यास दौऱ्यावर आहेत. असे असले तरी प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या पक्षांतराबाबत वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध होत असल्याने त्यांच्या कार्यालयाकडून पक्षातरांचे खंडन करण्यात आले आहे. ते मायदेशी परतल्यानंतरच काय ती भूमिका स्पष्ट करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे. तर धुळे जिल्ह्यात एकमेव असलेले धुळे ग्रामीण मतदारसंघातील आ. कुणाल पाटील यांच्याकडून देखील याबाबत ठोस भूमिका जाहीर न करताच वडील आजारी असल्याचे कारण देण्यात आले. तर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर आणि अक्कलकुवा या दोन मतदारसंघांत असलेले आमदार अनुक्रमे शिरीष नाईक व के.सी. पाडवी यांच्याकडूनही कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, हे दोन्ही आमदार कॉंग्रेस सोडण्याची शक्यता नसल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा :