नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे बाळकडू मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी टॅलेंट सर्च परीक्षा काम करेल, असे प्रतिपादन सहायक प्रकल्प अधिकारी रामचंद्र तडवी यांनी केले आहे.
नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागांतर्गत टॅलेंट सर्च परीक्षेसाठी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. दिंडोरी येथील नाळेगाव या ठिकाणी शनिवारी (दि. १०) झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाला सहायक प्रकल्प अधिकारी प्रल्हाद भोई, शिक्षण विस्तार अधिकारी प्रमिला सावंत, नाळेगाव आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एस. बी. तमखाने, तज्ज्ञ प्रशिक्षक रमाकांत जगताप, वाल्मीक चव्हाण, दैनिक पुढारीचे वितरण सरव्यवस्थापक सुनील लोंढे, दैनिक पुढारीचे विभाग व्यवस्थापक (नाशिक) राजेश पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सहायक प्रकल्प अधिकारी तडवी यांनी, स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना टिकविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न शासनाच्या वतीने सुरू आहेत. त्याला दैनिक पुढारीच्या सहकार्याने होत असलेल्या या टॅलेंट सर्च परीक्षेचे बळ मिळत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना भविष्यात नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त करण्यास अडचणी येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यशाळेमध्ये तज्ज्ञशिक्षक रमाकांत जगताप आणि वाल्मीक चव्हाण यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. विभागाच्या शिक्षकांना नक्कीच याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमासाठी आदिवासी विभाग प्रकल्प अधिकारी जितीन रहमान यांच्यासह सहायक प्रकल्प अधिकारी केतन पवार, नितांत कांबळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रशिक्षणासाठी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव, गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, डॉ. मिता चौधरी यांचे सहकार्य लाभले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी वितरणप्रमुख शरद धनवटे व सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.
जिल्हाभरातून शिक्षकांची उपस्थिती
टॅलेंट सर्च परीक्षेचा उद्देश, महत्त्व, शंकासमाधान, उत्तरपत्रिकेची माहिती, तांत्रिक बाबी, शिक्षकांना विषयवार मार्गदर्शन, क्लृप्त्या, विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेण्यातची पद्धत याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेला जिल्ह्यातून ७२ शिक्षकांनी उपस्थिती दर्शवत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.