नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरात होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय महोत्सवासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष कार्यन्वित करण्यात आला आहे. महोत्सवाचा समारोप होईपर्यंत हा कक्ष सुरू राहणार आहे. या कक्षात कर्मचाऱ्यांची तातडीने नेमणूक होऊन अन्य विभागांशी समन्वय राखला जात आहे.
नाशिकमध्ये येत्या १२ ते १६ जानेवारी या काळात राष्ट्रीय युवा महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. या कक्षातून विविध बैठकांचे इतिवृत्त करणे, सरकारच्या विविध विभागांशी पत्रव्यवहार करणे, आदेश काढणे यासह अन्य कामे केली जात आहेत.
प्रशासनाने या कक्षाकरिता सकाळ व रात्रपाळीमध्ये ११ अधिकारी व कर्मचारी नियुक्त केली आहे. त्यामध्ये लिपीक, अव्वल कारकून पदांवरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ तसेच सायंकाळी सहा ते रात्री ११ या वेळेत या कर्मचाऱ्यांना या कक्षात कर्तव्य पार पाडावे लागणार आहे. रात्री ११ ते सकाळी १० यावेळेत नियंत्रण कक्षात नेहमीप्रमाणे निरनिराळे सरकारी कर्मचारी नियुक्ती असतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी काढलेल्या आदेशात नमूद आहे.
अशी असेल जबाबदारी
नियंत्रण कक्षात नेमलेल्या कर्मचाऱ्यांवर विविध जबाबदारी असणार आहे. सर्वप्रथम त्यांनी नेमून दिलेल्या दिनांकास आणि वेळेत न चुकता कक्षात उपस्थित राहायचे आहे. तसेच दूरध्वनीवरील महत्त्वाची माहिती व आलेले संदेश तपशीलवारपणे नोंदवहीत घेणे. विषयाच्या गंभीरतेनुसार तत्काळ, विनाविलंब कार्यवाही करणे, महत्त्वाच्या घटनांची माहिती त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणे, आपत्ती व्यवस्थापनच्या उपाययोजनांची माहिती नागरिकांना देण्यासह पत्र, फॅक्स व ई-मेलद्वारे अन्य विभागांशी संपर्कात राहावे लागेल. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईसह एक वर्ष कारावासाच्या शिक्षेस संबंधित कर्मचारी पात्र राहील, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
हेही वाचा :