महाराष्ट्राचे पक्षितीर्थ समजल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर (Nandur Madhyameshwar) पक्षी अभयारण्यात उत्तर युराेप आणि उत्तर रशियामधून आलेल्या 'जॅक स्नाइप' (Jack Snipe) पक्ष्याचे दर्शन झाले असून, या पक्ष्याचे निरीक्षण करण्यासाठी देशभरातील पक्षिप्रेमी अभयारण्यात पोहोचले आहेत. इग्लंडमधील बर्ड्स आॅफ कॉन्झर्व्हेशन कन्सर्न या संस्थेने या पक्ष्याला अतिदुर्मीळ पक्ष्यांच्या यादीत समाविष्ट केले आहे.
'जॅक स्नाइप' (Jack Snipe) पक्षी उत्तर युरोप, रशिया आणि सायबेरियामध्ये प्रजनन करतात आणि युरोप, आफ्रिका आणि आशियामध्ये हिवाळ्यात पश्चिम आणि दक्षिणेकडे स्थलांतर करता. आयर्लंडमध्ये संपूर्ण हिवाळ्याच्या कालावधीत आणि मार्गावरदेखील आढळतात. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये कमाल तापमानात झालेल्या अभूतपूर्व वाढीमुळे स्थलांतरित पक्ष्यांना त्यांच्या नियोजित वेळेआधी उच्च उंचीवर परतावे लागत असल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. दरम्यान, जॅक स्नाइप स्थलांतरित पक्षी असून, हे पक्षी ग्रेट ब्रिटन, अटलांटिक आणि भूमध्य सागरी किनारपट्टी युरोप, आफ्रिका आणि भारतात गैरप्रजनन कालावधी घालवतात. जॅक स्नाइप या प्रजातीला आफ्रिकन-युरेशियन स्थलांतरित वॉटरबर्ड्सच्या संरक्षणावरील करार लागू होतो.
'जॅक स्नाइप' (Jack Snipe) हा पक्षी त्याच्या छोट्या चोचीमुळे सहज ओळखता येतो. या पक्ष्याची लांबी १८ ते २५ सेमी, पंखांचा विस्तार ३० ते ४१ सेमी आणि वजन ३३ ते ७३ ग्रॅम इतके आहे. शरीरावर तपकिरी आणि खाली फिकट गुलाबी रंग असून, त्याच्या डोळ्यातून एक गडद पट्टा दिसतो. पंख टोकदार आणि अरुंद असून, पाठीवर पिवळे पट्टे उडताना दिसतात.
उत्तर युरोप आणि उत्तर रशियामध्ये वनस्पती असलेले दलदल आणि ओले कुरण हे त्यांचे प्रजनन निवासस्थान आहे. मऊ चिखलात हे पक्षी खाद्य शोधतात. ते प्रामुख्याने कीटक आणि गांडूळ खातात. तसेच वनस्पतीदेखील खातात. प्रणय दरम्यान नर एक हवाई प्रदर्शन करतो. ज्या दरम्यान तो घोड्यासारखा विशिष्ट आवाज काढतो. हिवाळ्यात ते शांत असतात. ते जमिनीवर घरटे बांधतात, ३ ते ४ अंडी घालतात.
हिवाळा सुरू झाल्याने, अनेक स्थलांतरित पक्षी अभयारण्यात येत आहेत. जॅक स्नाइप पक्षी बघण्यासाठी देशभरातील पक्षिमित्र गर्दी करीत आहेत.
– रोषण पोटे, गाइड
हेही वाचा :