Vishwambhar Chaudhary : डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या व्याख्यानाप्रसंगी गोंधळ, हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप
सिन्नर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा, सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सवी ग्रंथालय सप्ताहात व्याख्याते डॉ. विश्वंभर चौधरी (Vishwambhar Chaudhar) यांच्या व्याख्यानावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी प्रचंड गोंधळ घालत हे व्याख्यान बंद पाडले. चौधरी हिंदुत्वविरोधी विचार व्यक्त करत असल्याचा आरोप या संघटनांनी केला.
सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचा सुवर्णमहोत्सवी ग्रंथालय सप्ताह नुकताच सुरू झाला. यात रविवारी (दि. 3) डॉ. विश्वंभर चौधरी यांचे 'निर्भय बनो' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. चौधरी यांच्या व्याख्यानाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या पाच – दहा मिनिटांतच ते राजकीय भाषण व हिंदू धर्मविरोधी भाषा वापरत असल्याचा आक्षेप भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आदी हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतला.
त्यामुळे व्याख्यानादरम्यान एकच गोंधळ उडाला. चौधरी हे संबंधित कार्यकर्त्यांना, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतो, असे सांगत असताना, कार्यकर्ते मात्र व्यासपीठाकडे धावून गेले. त्यांचा माइकही हिसकावण्यात आला. तसेच व्याख्यानाचे बॅनरही फाडण्यात आले. काही कार्यकर्त्यांनी चौधरी यांना दमबाजी व धक्काबुक्की केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान वातावरण चिघळत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी शांततेचे आवाहन केले. मात्र कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी 'भारत माता की जय', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय श्रीराम' अशी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे चौधरी यांचे व्याख्यान थांबविण्यात आल्याचे घोषित करावे लागले. (Vishwambhar Chaudhar)
दरम्यान प्रचंड गोंधळ झाल्यानंतर श्रोत्यांनी सभागृह सोडण्यास सुरुवात केली. या गोंधळानंतर चौधरी यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तत्काळ डॉक्टरांना बोलावून उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी नाशिककडे प्रस्थान केले. दरम्यान या घटनेचा सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. गेली 50 वर्षे सुरू असलेल्या ग्रंथालय सप्ताहाला या घटनेमुळे गालबोट लागल्याची भावना वाचक, श्रोते व नागरिकांनी बोलून दाखवली.
डॉ. चौधरी (Vishwambhar Chaudhar) यांचे व्याख्यान असल्यामुळे दोन दिवस अगोदरच हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांना संबंधित व्याख्याते एकाच पक्ष व्यक्ती आणि धर्माविरुद्ध अतिशय टोकाचे बोलत असतात. त्यामुळे त्यांना याबाबत समज द्यावी अशी मागणी केली होती.
विश्वंभर चौधरी ही व्यक्ती एकाच धर्माविरुद्ध बोलत असते प्रभू रामचंद्र हे आमचे श्रद्धास्थान आहे आणि त्यांच्या विरोधात बोललेले आम्ही कदापि खपवून घेणार नाही. चौधरी यांनी अन्य धर्मांच्या विरोधात बोलून दाखवावे.
– जयंत आव्हाड, प्रभारी भाजप सिन्नर
सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचा यंदा सुवर्णमहोत्सवी ग्रंथालय सप्ताह अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असताना, काही उथळ कार्यकर्त्यांनी गोंधळ निर्माण करून या विचारांच्या उत्सवाला गालबोट लावले आहे. त्यांचा आम्ही निषेध करतो.
-कृष्णाजी भगत, अध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय
हेही वाचा :