नाशिक : सिडकोत अतिक्रमण हटाव मोहीम, साहित्यासह टपऱ्या जप्त

सिडकोत अतिक्रमण हटाव,www.pudhari.news
सिडकोत अतिक्रमण हटाव,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा

मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने गोविंदनगर व सिडको भागात 'अतिक्रमण हटाव मोहीम' राबवून वाहतुकीस अडथळा व अपघातास कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे काढली. यात विविध साहित्यासह दहा अवजड टपऱ्या जप्त करण्यात आल्या.

वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महामार्ग तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांचा आढावा घेऊन तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सिडको परिसरातील स्टेट बँक चौक, लेखानगर, पाथर्डी फाटा परिसर, गोविंद नगर, म्हसोबा मंदिर, उंटवाडी, त्रिमूर्ती चौक, पवननगर, उत्तमनगर भागात वाहतुकीस अडथळा निर्माण करून अपघातास कारणीभूत ठरणारे अतिक्रमण काढण्यात आले. काही ठिकाणी दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याची तयारी दर्शविल्याने त्यांना तत्काळ अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. काही ठिकाणी पालिकेचे अधिकारी व दुकानदार यांच्यासोबत वादाचेही प्रसंग उद‌्भवले.

सिडको विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे पथक समन्व्यक मयूर काळे, प्रदीप जाधव, उमेश खैरे, मिलींद ढोले, अभंग, अनिल लोहकरे यांच्यासह मनपाच्या सहा विभागांचे कर्मचारी यांच्या मदतीने संयुक्तपणे मोहीम राबविण्यात आली. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

अतिक्रमण हटाव मोहीम आगामी कालावधीत सुरूच राहणार आहे. किंबहुना ती अधिक तीव्र होणार आहे. रस्त्यावर अनधिकृतपणे केलेले अतिक्रमण नागरिकांनी स्वत:हून काढून टाकावीत, अन्यथा त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता धडक कारवाई करून अतिक्रमण काढले जाईल. सिडको परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.

– डॉ. मयूर पाटील, विभागीय अधिकारी, मनपा.

पक्क्या बांधकामांवर हातोडा कधी?

ऐन दिवाळीच्या तोंडावर राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे काही विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सिडको परिसरातील केवळ टपऱ्या हटविल्या जात आहेत. सिडकोसह भंगार बाजारामध्येही अनेक वर्षांपासून बहुतांश पक्की बांधकामे असताना त्याकडे डोळेझाक करून केवळ हातगाडी, टपरीचालकांवरच कारवाई केली जाते, असा आरोप काही टपरीचालकांनी केला आहे. मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाने दुजाभाव न करता अतिक्रमित पक्की बांधकामेही हटवावीत, अशी प्रतिक्रिया काही टपरीचालकांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news