नाशिक : गिरणा धरण इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर | पुढारी

नाशिक : गिरणा धरण इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर

मालेगाव (जि. नाशिक) : सुदर्शन पगार
मुसळधार पावसाने जुलैच्या मध्यावरच नाशिक जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्प भरले असून, सात प्रकल्पांतील जलस्तर 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेले गिरणा धरण इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. 15 जुलैला 86 टक्के भरलेले हे यंदा सलग चौथ्यांदा ओव्हरफ्लो होणार आहे. यापूर्वी 2004 ते 2007 या चार वर्षांत सलग धरण भरले होते. सध्या धरणात पाच हजार क्यूसेकपेक्षा अधिक वेगाने पाण्याची आवक होत आहे. ती पाहता 2005 चा विक्रम मोडीत निघेल. तेव्हा 2 ऑगस्टला गिरणा काठोकाठ भरले होते. ती पातळी यंदा तत्पूर्वीच गाठण्याची चिन्हे आहेत.

एक लाख 41 हजार 364 एकर सिंचन क्षेत्र, 158 हून अधिक ग्रामीण आणि चार शहरी पाणीपुरवठा योजनांना संजीवनी देणारे गिरणा धरण तब्बल 21 हजार 500 दलघफू असा विशाल जलसंचय करते. मृतसाठा वगळता, 18 हजार 500 दलघफू एवढा संकल्पित साठा आहे. आठवड्याच्या प्रारंभी सुरगाणा, कळवण आणि बागलाण तालुक्यांत झालेल्या मुसळधार पावसाने गिरणा, आरम, मोसम, पुनद यासह लहान-मोठ्या नद्यांना पूर आला. प्रथम हरणबारी धरण भरले. केळझरसह हे लघुप्रकल्पही ओसंडले. चणकापूरमधील पाण्याची आवक 50 टक्क्यांवर मर्यादित करीत मोठ्या प्रमाणात विसर्ग केला गेला. परिणामी, 15 जुलै उजाडेपर्यंतच गिरणा धरणात 88 टक्क्यांपर्यंत जलसंचय झाला. पूर ओसरला असला, तरी गिरणा आणि मोसम नदी दुथडी वाहत आहे. जवळपास पाच हजार क्यूसेक वेगाने पाणी गिरणाच्या कुंभात येत असल्याने ऑगस्ट उजाडण्यापूर्वीच धरण ओव्हरफ्लो होण्याची दाट शक्यता आहे.

गतवर्षी 15 जुलैला धरणात केवळ 36 टक्के (6675 दलघफू) एवढाच साठा होता. तो 100 टक्के होण्यास 30 सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागली होती. आज धरणात 15 हजार 914 दलघफू एवढा साठा झाला आहे. अथांग जलसागर पाहण्यासाठी पर्यटकांची धरण परिसरात गर्दी होऊ लागली आहे. सध्या बकरी ईदच्या सुट्या सुरू असल्याने मुस्लीम बांधव सहकुटुंब धरणस्थळी धाव घेत आहेत. धरणाच्या भिंतीवर आणि मोर्‍यांच्या परिसरात नागरिकांचा मुक्त संचार पहायला मिळत आहे. आता धरणातून पाण्याचा विसर्ग केव्हा सुरू होतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हे विशेष
1969 मध्ये बांधकाम पूर्ण झालेले हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास चार वर्ष लागले होते. 6 ऑक्टोबर 1971ला प्रथमच धरण ओव्हरफ्लो झाले होते. तेव्हापासून गतवर्षापर्यंत 11 वेळा धरण भरल्याची नोंद आहे, तर चार वेळा 90 टक्क्यांवर जलसाठा झाला होता. यंदा गिरणाकुंभ भरण्याची बारावी वेळ असेल. 2015 मध्ये दुष्काळाची दाहकता दिसली होती.

हेही वाचा :

Back to top button