नंदुरबार : वाहतूक पोलिसांचा दणका, ५६ मद्यपी वाहनधारकांचे परवाने रद्द | पुढारी

नंदुरबार : वाहतूक पोलिसांचा दणका, ५६ मद्यपी वाहनधारकांचे परवाने रद्द

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : आगामी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दारु पिऊन वाहन चालविताना कोणी दुचाकीस्वार व चार चाकीस्वार आढळून आल्यास त्यांच्यावर अधिक कठोर कारवाई करून लायसन्स निलंबित करणेची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी असे सांगत नागरिकांसाठी इशारा दिला आहे. तसेच ५६ मद्यपी वाहनधारकांचे परवाने रद्द केल्याचे देखील त्यांनी सांगितले.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्यावतीने पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, दारु पिऊन कोणीही वाहन चालवू नये, दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांच्या जीवितास देखील धोकादायक आहे. नागरिकांनी स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पालन करून प्रवास करावा. तसेच कोणीही मद्यपान करुन वाहन चालवू नये.

तसेच, रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येमध्ये झालेली वाढ लक्षात घेत नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांविरुध्द् विशेष मोहिम सुरू केली आहे. आतापर्यंत १७० मद्यपी चालकांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून ५६ वाहन चालकांचे लायसन्स निलंबीत करण्याचे प्रस्ताव उप प्रादेशीक परिवहन अधिकारी नंदुरबार यांचे कार्यालयात पाठविण्यात आले आहेत. तसेच भविष्यात ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

नंदुरबार शहर २१. उपनगर ५, नंदुरबार तालुका १०. विसरवाडी २८, नवापुर २४, शहादा १०, सारंगखेडा ६, म्हसावद ६. धडगाव १०. अक्कलकुवा ९, तळोदा ८, मोलगी ७, शहर वाहतूक शाखा २६ असे एकूण १७० गुन्हे मद्यपी चालकांवर नोंदविण्यात आले आहेत. त्यातील ८ वाहन चालकांचे लायसन्स यापुर्वी ३ महिने व ६ महिनेसाठी निलंबित करण्यात आले आहेत.

एकूण ५६ वाहन चालकांचे लायसन्स निलंबित करण्याचे प्रस्ताव उप प्रादेशीक परिवहन अधिकारी नंदुरबार यांचे कार्यालयात पाठविण्यात आले आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button