धुळे : पोलीसांवर हल्ला करून दोघे सराईत गुन्हेगार पसार | पुढारी

धुळे : पोलीसांवर हल्ला करून दोघे सराईत गुन्हेगार पसार

धुळे; पुढारी वृत्तसेवा

नांदेड येथील लुटीच्या गुन्ह्यातील दोघा सराईत गुन्हेगारांनी पोलिसांवर हल्ला करून धुम ठोकली. धुळे तालुक्यातील कुसुंबा नजीक नागपूर सुरत महामार्गावर ही घटना घडली आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या 4 पोलिसांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

पंजाब राज्यात राहणारे नवप्रीतसिंह तारेसिंह उर्फ मनदीपसिंह सुरजितसिंग जाट आणि मोहित ऊर्फ मनी विजय शर्मा या दोघांवर नांदेड येथून दुचाकी चोरून नेल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील एम एच 26 व्ही 95 56 क्रमांकाच्या मोटारसायकलसह या दोघा आरोपींना गुजरात राज्यातील व्यारा येथून नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतले.

यासाठी नांदेड येथील विमानतळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एकनाथ देवके यांनी नांदेड न्यायालयातून या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी वॉरंट घेऊन हे पथक गुजरात राज्यात रवाना झाले. यानंतर पोलीस पथकाने या आरोपींना शासकीय वाहनाने घेऊन नागपूर सुरत-महामार्गे नांदेड येथे जाण्यासाठी रवाना झाले.

पोलीस व्हॅन धुळे तालुक्यातील कुसुंबा शिवारात पोहोचली. त्यावेळी दोघा आरोपींनी गाडीत असलेल्या पोलीस पथकावर हल्ला चढवला. या आरोपींनी हातात असलेल्या बेड्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर वार केल्यामुळे चौघे पोलीस जखमी झाले. यानंतर बेड्या तोडून दोघा आरोपींनी गाडीच्या बाहेर उडी मारून शेतातून पलायन केले.

या घटनेनंतर पोलिस पथकाने पाठलाग करून दोघांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. अखेर ही माहिती तालूका पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर धुळे तालुका पोलिसांचे पथक कुसुंबा आणि परिसरात या आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहेत.

हेही वाचा

Back to top button