धुळे, पुढारी वृत्तसेवा
आणखी दोघांना कोरोना झाल्याची बाब उघडकीस आल्याने धुळेकरांची चिंता वाढली आहे. या सर्वांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय प्रशासनाने दिली आहे.
धुळे जिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. याअंतर्गत इंग्लंडमधून आलेल्या एका महिला डॉक्टरची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. सर्वप्रथम विमानतळावर घेण्यात आलेल्या स्वॅबच्या अहवालात या महिलेला कोरोना झाला नसल्याचा अहवाल आला.
यानंतरही धुळे जिल्ह्यात आल्यानंतर या महिलेची कोरोणा तपासणी केली असता, तिचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र काही दिवसांनंतर एका खासगी लॅबमध्ये ही तपासणी केली असता, या महिला डॉक्टरला कोरोना झाल्याचा अहवाल आला आहे. त्याशिवाय तिच्या मुलालाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे.
त्यानंतर या दोघांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या परिवारातील आणखी दोघांनाही कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आल्याने चिंता वाढत आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभुमीवर त्यांच्या स्वॅबचे नमुने पुढील तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. सध्या या चौघा रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मात्र नागरिकांनी गर्दीची ठिकाणे टाळून मास्कचा वापर करावा, असे आवाहन वैद्यकीय प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा