जळगाव : पाल वनक्षेत्रात ९ वर्षीय बालकावर बिबट्याचा हल्ला | पुढारी

जळगाव : पाल वनक्षेत्रात ९ वर्षीय बालकावर बिबट्याचा हल्ला

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

रावेर तालुक्यातील पाल राखीव वनक्षेत्रात शेळ्या चारणाऱ्या ९ वर्षीय बालकांवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मध्य प्रदेशाच्या हद्दीतील मांजल येथील दिपल्या बारेला मित्रासोबत दररोज शेळी व गुरे चारण्यासाठी जातो. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी शेळी व गुरे चारण्यासाठी वन्यजीव वनहद्दीतील कं.नं. ६१ मध्ये (पाल वनक्षेत्र चार -१ नियतक्षेत्र कक्ष क्रं. ६१- ६२ हद्दीत ) गेला याठिकाणी झुडुपांमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने आधी शेळीवर हल्ला चढवला व नंतर गुराखी दिपल्या बारेला याच्यावर हल्ला करून नाकावर, तोंडावर, पायावर व पाठीवर वार करीत गंभीर जखमी केले. या हल्ल्याच्यावेळी दीपल्यासोबत असलेले काही मुले घटना स्थळावरून पळून गेले होते

या सोबतच्या मुलांनी गावात जाऊन गावकऱ्यांना घटनेबाबत सांगितले. गांवकरी घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत बालकाला गंभीर जखमी करून बिबट्या पसार झाला होता. नंतर त्याचे वडील माल्या बारेला व ग्रामस्थानी जखमी दिपल्या बारेला याला दुचाकीवर तत्काळ पाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन पाटील यांनी प्राथमिक उपचार केले.

दिपल्या बारेला याच्या दोन्ही हातावर आणि पायावर बिबट्याची नखे लागली असून डोक्याची कवटी फुटलेली असल्याने सिटी स्कॅन व पुढील उपचार करण्यासाठी जळगाव येथे रवाना केले असल्याची माहिती वैदकीय अधिकारी डॉ सचिन पाटील यांनी दिली. सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी खोपडे, वनपरिक्षेत्र अधिकारी सत्यजित निकत, वनरक्षक नवल चव्हाण , त्याचे वडील माल्या बारेला , काका हिरालाल बारेला यांनी या मुलांला प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेले तेथुन जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले यावेळी त्याच्यावर उपचार सुरू आहे.

Back to top button