MSEDCL : ४ लाख ग्राहकांनी थकवले महावितरणचे तब्बल ४१५ कोटी | पुढारी

MSEDCL : ४ लाख ग्राहकांनी थकवले महावितरणचे तब्बल ४१५ कोटी

नंदुरबार; योगेंद्र जोशी

वेगवेगळ्या आर्थिक कारणामुळे वीज बिल थकवणारा विशिष्ट वर्ग असतो. अशा दोन-तीन हजार नव्हे तर तब्बल 4 लाख वीज ग्राहकांनी मागील दहा महिन्यात एकदाही वीज बिल भरलेले नसून सुमारे 145 कोटी रुपये थकवून महावितरण कंपनीला (MSEDCL) निराळाच शॉक दिला आहे.

महावितरण कंपनीदेखील एक ग्राहक असून या कंपनीलाही आर्थिक देणेदारी असते. या कंपनीला सांभाळण्यासाठी आजच्या घडीला आपल्या आधाराची आवश्यकता आहे. तेव्हा प्रत्येक ग्राहकाने वीज बिल भरून सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन महावितरण अधिकाऱ्यांकडून वारंवार केले जात आहे. परंतु काही वीजग्राहक असे असतात की वीज बिल नियमित भरतच नाहीत.

प्राप्त माहितीनुसार महावितरण कंपनीला सर्व स्तरात असे काही ग्राहक आढळले आहेत, ज्यांनी मागील दहा महिन्यात एकदाही वीज बिल भरलेले नाही. महावितरणकडील एका माहितीनुसार, घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व सार्वजनिक सेवा क्षेत्रातील थकबाकीदार ३ लाख ९३ हजार ७९६ वीजग्राहकांनी गेल्या नोव्हेंबर २०२० पासून एकाही महिन्याचे वीजबिल भरलेले नाही. (MSEDCL)

या सर्व ग्राहकांकडे ४१५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये सर्वाधिक ३ लाख ७२ हजार ९५५ घरगुती ग्राहकांचा समावेश आहे व त्यांच्याकडे ३७४ कोटी २६ लाख रुपयांची थकबाकी आहे. यानंतर वाणिज्यिक व सार्वजनिक सेवाक्षेत्रातील १९ हजार ६०१ ग्राहकांकडे ३४ कोटी रुपयांची तसेच १२४० औद्योगिक ग्राहकांकडे ६ कोटी ८ लाख रुपयांची थकबाकी आहे. या सर्वच ग्राहकांनी गेल्या नोव्हेंबर २०२० पासून एकाही महिन्याचे वीजबिल भरलेले नाही. अशा कारणांमुळे महावितरणवर थकबाकीचा बोजा अधिकच वाढला आहे.

थकबाकीचा ‘महा थकबाकी’ या शब्दात उल्लेख करावा एवढ्या मोठ्या स्वरूपाची आकडेवारी आहे. जबाबदार अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, प्रामुख्याने वीजबिलांच्या दरमहा वसुलीवरच संपूर्ण आर्थिक मदार असलेल्या महावितरणच्या उच्च व लघुदाबाच्या वीजग्राहकांकडे तब्बल ७३ हजार ८७९ कोटी रुपयांची महाथकबाकी आहे. (MSEDCL)

यामध्ये कृषी ग्राहकांवरील १० हजार ४२० कोटी रुपयांची थकबाकी निर्लेखित करण्यात आली आहे. मात्र वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक घडी विस्कटली असून वीजखरेदीसह विविध खर्चांमध्ये ताळमेळ साधण्यासाठी सध्या अभूतपूर्व कसरत महावितरणला करावी लागत आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button