विनायक मेटे : ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवण्यात परिवहन मंत्री अनिल परबांना अपयश’ | पुढारी

विनायक मेटे : 'एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवण्यात परिवहन मंत्री अनिल परबांना अपयश'

धुळे; पुढारी वृत्तसेवा

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे राज्यातील ठाकरे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आज शिवसंग्राम संघटनेचे नेते तथा माजी आमदार विनायक मेटे यांनी धुळ्यात केला. कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवण्यात परिवहन मंत्री अनिल परब यांना अपयश आल्याचा टोला देखील त्यांनी यावेळी लावला.

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे जिल्हा परिषदेचे सदस्य ज्ञानेश्‍वर भामरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आज विनायक मेटे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला. एसटी कर्मचाऱ्यांचा समोर अनेक समस्या असून या समस्या सोडवण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून वारंवार सरकारकडे करण्यात आली. मात्र, सरकारने या मागण्या सोडविण्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारले आहे.

राज्यात सर्व ठिकाणी दिवाळी साजरी होत असताना मागण्यांमुळे व्यथित होऊन सुमारे 35 कर्मचाऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. मात्र या गंभीर परिस्थितीकडे सरकारने लक्ष दिले नसल्याचा आरोप देखील यावेळी मेटे यांनी केला.

परिवहन मंत्री अनिल परब हे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरले असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विभागाकडे लक्ष घालून कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी देखील यावेळी मेटे यांनी केली आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button