देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे गावच्या मुख्य रस्त्याची झालेली वाताहत व त्यामुळे कित्येक वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या गावकऱ्यांनी दिलेला आंदोलनाचा इशारा याची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार रचना पवार यांना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तहसीलदार यांनी काल प्रत्यक्ष गावात येऊन रस्त्याची पाहणी केली व लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी एक सप्टेंबरपासून दिलेला उपोषणाचा इशारा तूर्तास स्थगित केला आहे.
नाशिक तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गावाला रस्त्याची अडचण गेल्या 70 वर्षांपासून भेडसावत आहे. एका बाजूला लष्कराची हद्द, दुसऱ्या बाजूला डोंगर, तर तिसऱ्या बाजूला नदी व रेल्वे अशा पार्श्वभूमीवर गावातील पारंपरिक वहिवाटीचा रस्ता अनेक वर्षांपासून वादात अडकलेला आहे. या मुख्य रस्त्याचे काम होऊ दिले जात नाही. ग्रामपंचायत लोहशिंगवेने गेल्या एक वर्षापासून तहसीलदारांकडे गावच्या मुख्य रस्त्यासाठी वहिवाट केस दाखल केलेली आहे. परंतु त्यावर निकालस होण्याआधीच तहसीलदारांची बदली झाली, एक तहसीलदार निलंबित झाले परंतु ग्रामस्थांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही. त्यामुळे गावातील युवा पिढी संतप्त होऊन आक्रमक झाली, ग्रामसभेमध्ये यावर चर्चा होऊन लोकशाही मार्गाने आंदोलनाचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मागील महिन्यात जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन लवकरात लवकर लोहशिंगवे गावच्या मुख्य रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 सप्टेंबरपासून उपोषणास बसतील, असा इशारादेखील निवेदनाद्वारे देण्यात आला होता. त्यानुसार प्रभारी तहसीलदार रचना पवार यांनी काल अधिकाऱ्यांसह लोहशिंगवे गावातील रस्त्याच्या ठिकाणाला भेट दिली. वस्तुस्थिती जाणून घेत पंचनामा करीत लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावून ग्रामस्थांना न्याय देऊ, असे सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी दिलेला उपोषणाचा इशारा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी युवराज जुंद्रे, माजी सरपंच भगवान जुंद्रे, विष्णू बेरड, जगदीश रखिबे, किरण जुंद्रे, अविनाश वाघचौरे, सुखदेव जुंद्रे, सुकदेव पाटोळे, हरिभाऊ पाटोळे, वाळू गंधे, रमेश रावजी पाटोळे, शिवाजो डांगे, आकाश पाटोळे, अंबादास मोरे, ग्रामसेवक उमेश चौधरी, सोमनाथ चौधरी, उत्तम जुंद्रे, कैलास जुंद्रे, दशरथ जुंद्रे, भाऊसाहेब जुंद्रे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही वाचा :