पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
द्राक्ष व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी होऊन सुकेणा, उगाव परिसरासह निफाड तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या तिघांना पाेलिस कोठडी देण्यात आली.
बीके फ्रूट क्फत संशयित मनोज साहू (रा. चंद्रभागानगर, पिंपळगाव बसवंत), लक्ष्मण शिंदे (रा. वनसगाव) व जितू पाटील (रा. पिंपळगाव बसवंत) यांनी शेतकऱ्यांच्या द्राक्षबागेत जाऊन द्राक्षमालाचा ४५ रुपये क्विंटल दराने व्यवहार ठरवला होता. मनोज साहूने एका शेतकऱ्याला द्राक्षमालाचे पहिल्या दिवशी ८३ हजार रोख देऊन विश्वास संपादन केला आणि २०२ क्विंटल ८० किलो द्राक्षमाल तोडून नेला होता. द्राक्षमालाच्या उर्वरित आठ लाख २९ हजारांचा धनादेश दिला. संबंधित शेतकऱ्याचा धनादेश वटला नाही. इतर शेतकऱ्यांबाबतही असाच प्रकार झाल्याने शेतकऱ्यांनी ओझर पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयितांना अटक करून पिंपळगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पाेलिस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांचे आवाहन
भविष्यात अशा व्यापाऱ्यांशी कुठलाही व्यवहार करू नये, असे आवाहन पाेलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी "शेतकऱ्यांचे कैवारी – दुर्गेश तिवारी" अशा घोषणाबाजी करत पाेलिस कारवाईचे स्वागत केले. पाेलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सुरू केलेल्या बळीराजा सन्मान हेल्पलाइनच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांकडे अडकलेले पैसे मिळवून दिले जात आहे. ज्या शेतकऱ्यांचे पैसे बाकी असतील, त्यांनी तक्रारी देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन तिवारी यांनी केले आहे.
एक – दीड वर्षापासून द्राक्ष व्यापाऱ्यांकडे अडकलेले पैसे मिळत नसल्याने आम्ही ओझर पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाेलिस प्रशासनाचे सहकार्य लाभल्याने अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल.
– रवि बोरगुडे, शेतकरी, नैताळे
शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या व्यापारी व त्यांच्या प्रतिनिधींनी लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. त्यांच्याकडे कोटी रुपयांची संपत्ती असून, शेतकऱ्यांना मात्र पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
– महेश शेजवळ, शेतकरी, ओझर
हेही वाचा :