धुळे : पुढारी वृत्तसेवा
धुळे जिल्हयात सलग 25 दिवसापेक्षा अधिक पाऊसच झाला नसल्याने शेतकर्यांची पिके करपू लागली आहे. जिल्हयात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकर्यांनी पिक विमा काढला असून धुळे जिल्हयात मध्य हंगामातील प्रतिकूलता जाहिर करुन शेतकर्यांना 25 टक्के अग्रीम रक्कम विमा कंपनीने तत्काळ नुकसान भरपाई म्हणून द्यावी अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
पाऊस नसल्याने धुळे जिल्हयात दुष्काळाची भीषणता जाणवू लागली आहे. सुरुवातीपासूनच सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्याने कोरडा दुष्काळाचे चित्र स्पष्ट झाले आहे. कर्जाने पैसे घेवून शेतकर्यांनी मशागत केली, पेरणी केली काही ठिकाणी पिके जेमतेम जमीनीबाहेर आले मात्र पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली तर तीच पिके करपू लागली आहेत. जिल्हयात गेल्या 25 दिवसापासून पावसाने खंड दिला आहे. पाऊसच नसल्याने कपाशी, बाजरी, ज्वारी, भूईमुग, तूर, उडीद, मूग, कांदा यांच्यासह खरीपातील विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अर्थातच खरीप हंगाम हातचा गेला आहे.
शासनाच्या आवाहनानुसार शेतकर्यांनी खरीप पिकांचा विमा काढलेला आहे. दुष्काळीसदृश्य परिस्थिती आणि मध्य हंगामातील प्रतिकूलता जाहिर करुन शासनाने विमा कंपनीला शेतकर्यांना 25 टक्के अग्रीम रक्कम तत्काळ देण्याबाबत सूचना करावी अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी केली आहे. अग्रीम रक्कम दिल्यास शेतकर्यांना दिलासा मिळाणार असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले आहे.
हेही वाचा :