सप्तशृंगगड (जि. नाशिक) : तुषार बर्डे
श्रीक्षेत्र सप्तशृंगगड हे समुद्रसपाटीपासून पाच हजार फूट उंचीवर वसलेले तीर्थक्षेत्र आहे. सप्तशृंगी गाव संपूर्ण डोंगर रांगेत वसलेले असल्याने दरड क्षेत्र म्हणून शासनाने जाहीर केले आहे. रायगड जिल्ह्यात दरड कोसळून संपूर्ण गाव त्याखाली दबले गेल्याची घटना घडल्यानंतर सप्तशृंगगडाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत ग्रामस्थांकडून शासनाकडे उपाययोजना करण्याबाबत रेटा वाढला आहे.
चार दिवसांपूर्वीच सप्तशृंगीगडाच्या समोरील डोंगरावर मार्कंडेश्वर पर्वतावर दरड कोसळून दोन भाविक जखमी झाले होते. तसेच सात ते आठ वर्षांपूर्वीही सप्तशृंगी परिसरात भूस्खलन होऊन डोंगरालगतची माती ढासळल्याने जमिनीला तडे गेले होते. पण, याबाबत अद्यापही प्रशासकीय स्तरावर सोडाच देवी ट्रस्ट व ग्रामपंचायतीकडूनही काही बोध घेतला नसल्याचे दिसत आहे. गडावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे जमीन ही ओली होऊन असे प्रकार घडत असतात. सप्तशृंगी तीर्थक्षेत्र किंवा गाव हे डोंगर रांगेत असल्याने या ठिकाणी शासनाने उपाययोजनेसाठी पाऊल उचलून आराखडा तयार करावा, अशी आशाही भाविकांसह ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. दरम्यान, ग्रामस्थांनी याबाबत थेट मुख्यमंत्री यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पत्र पाठविले असून, याबाबत काय निर्णय होतो हे पाहावे लागणार आहे.
यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव
देवी संस्थान व ग्रामपंचायत यांच्यात काम करण्यासंबंधित आराखडा किंवा नियोजन नसल्याने व उपाययोजना करण्यासाठी दोन्ही संस्था शासन जबाबदारी प्रयत्नरत नसल्याने याबाबत संस्थान, ग्रामपंचायत, शासकीय यंत्रणा यांनी एकत्र बसून याबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.
हेही वाचा :