धुळे : बालकाच्या मृत्यूप्रकरणी वसतीगृहातील दोन कर्मचाऱ्यांसह ६ जणांवर गुन्हा दाखल
पिंपळनेर , पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावातील एकलव्य रेसिडन्सी स्कूल वसतीगृहात राहणाऱ्या एका बालकाच्या मृत्यूप्रकरणी वसतीगृहातील दोघा कर्मचाऱ्यांसह चार विधीसंघर्षित बालक अशा एकूण सहा जणांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात दिनेश जेजीराम बोरसे (वय ३९रा.दळूबाई गावठाण, पो .टेंभा ता.साक्री) यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत दिली आहे.
दिनेश बोरसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा निलेश दिनेश बोरसे (वय१३) हा पिंपळनेर गावातील एकलव्य रेसिडन्सी स्कूल वसतीगृहात राहत असतांना त्याची जबाबदारी ही कर्मचारी भूषण वसंत पाटील व ए.एच. सूर्यवंशी या दोघांवर असतांना निलेश हा दि.२सप्टेंबर २०२२ रोजी शाळा,वसतीगृहातून निघून गेला होता. याबाबत वरील दोघा कर्मचाऱ्यांनी त्याचे पालक दिनेश बोरसे यांना व कुठल्याही नातेवाईकांना काहीही कळवले नाही. तसेच तो बेपत्ता झाल्यानंतर दिनेश बोरसे संबंधितांनी उडवाउडवीची उत्तरे दिले.
दि.४ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता निलेश बोरसे हा बालक सामोडे पिंपळनेर रस्त्यांवरील शिवाजी भोये पेट्रोल पंपामागील पांझरा नदी पात्रात झाडा-झुडूपात मृतावस्थेत मिळून आला. त्याच्या मृत्यूस वरील दोघे कर्मचारी व वसतीगृहातील चौघे विधीसंघर्ष बालक हे कारणीभूत आहे,अशी तक्रार दिनेश बोरसे यांनी साक्री न्यायालयात दिली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर पिंपळनेर पोलिसांत भूषण पाटील,ए. एच.सूर्यवंशी व चौघे विधीसंघर्षित बालक अशा ६ जणांविरुध्द भादंवी कलम ३०४ (अ)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.