पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा
ध्येय निश्चित ठेवून यश संपादन करा. अथक परिश्रमातून उच्च ध्येयाची महत्त्वकांक्षा बाळगली तर अमर्याद असलेल्या संधीचे यशस्वी शिखर पार करणे शक्य आहे. असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक साजन सोनवणे यांनी केले.
येथील कर्म.आ.मा.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात समुपदेशन कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष सुरेंद्र मराठे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सपोनी श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक भुषण शेवाळे, संचालक डॉ. विवेकानंद शिंदे, सुभाष जैन, सेवानिवृत्त प्राचार्य ए.बी.मराठे, प्राचार्य आर.पी.लोहार, प्रा.डॉ.बि.सी.मोरे, प्रा.डॉ.ए.जी.खरात, उपप्राचार्या मीनाक्षी माळी, प्रा.पी.एम.सावळे, बी.पी.कुलकर्णी, प्रा.सी.एन.घरटे, पर्यवेक्षक पी.एच.पाटील, हिरामण चौरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना समुपदेशन करताना सोनवणे म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यास हा केंद्रबिंदू मानून भविष्यातील समृद्ध भारताचा आधार व सुजान नागरिक होण्याचे स्वप्न बाळगावे, यासाठी विविध क्षेत्रातील उच्च पदस्थ असलेल्या व्यक्तींचे व्यक्ती चरित्र वाचून आपले स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी प्रयत्न करावे. जीवनामध्ये मोठ-मोठे ध्येय व कर्तुत्व हे केवळ अथक परिश्रम, सचोटी चिकाटी व मेहनतीने पूर्ण करता येऊ शकते. यासाठी तुमच्यातला आत्मविश्वास दांडगा असायला हवा असेही त्यांनी सांगितले. देशात विविध क्षेत्रात विविध व्यक्तीमत्व केवळ त्यांच्या उच्च व मोठ्या स्वप्नांमुळेच मोठे झाले आहेत अशा व्यक्तीमत्वांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घेतला पाहिजे. तुमच्या मनात जर दुर्गुण असतील तर तुम्हाला कुठलाही विकास व ध्येय गाठता येणार नाही असे मार्गदर्शन त्यांनी केले.
यावेळी सपोनी पारधी यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा अतिरेक वापर टाळावा.आईची हाक आणि वडिलांचा धाक असलेली मुलं जीवनात निश्चित प्रगती करू शकतात. त्यामुळे अभ्यासावर अधिक जोर देऊन भविष्य घडविण्याचे मौलिक मार्गदर्शक केले. याप्रसंगी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन बी.एस.कोठावदे यांनी तर आभार पी.एच.पाटील यांनी मानले.